
दैनिक स्थैर्य | दि. २७ डिसेंबर २०२४ | बारामती |
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवत असताना मेडिकल, इंजिनिअरिंग क्षेत्रात लडकत स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गरुडझेप घेतली आहे. गुणवत्ता व दर्जाच्या जोरावर विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन लडकत स्कूल ऑफ फौंडेशनचे अध्यक्ष नामदेव लडकत यांनी केले.
लडकत स्कूल ऑफ फौंडेशनचे वार्षिक स्नेहसंमेलन व विज्ञान प्रदर्शन मंगळवार, २४ डिसेंबर रोजी संपन्न झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लडकत बोलत होते.
याप्रसंगी लडकत स्कूल ऑफ फौंडेशनचे सचिव गणेश लडकत, प्राचार्य रामचंद्र वाघ, सेवानिवृत्त मुख्यधापक यू. एम. शिंदे, समनव्यक प्रफुल्ल आखाडे, तानाजी गवळी व विद्यार्थी, पालक व शिक्षकवृंद उपस्थित होते.
आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्न करावेत. आठवीपासून प्रत्येक विद्यार्थ्याला नीट, सीएटी व जेईई परीक्षांसाठी तयार करून घेतले जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील परिपूर्ण व सखोल ज्ञान दिले जात असल्याचे नामदेव लडकत यांनी सांगितले.
मोबाईल कामापुरता वापरा, आई-वडिलांचे स्वप्न साकार करा, वेळेचे योग्य नियोजन करा, अभ्यास व मैदानी खेळ यांचा मेळ बसवा, असा सल्ला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अनिल सावळे-पाटील यांनी सांगितले.
व्यवसनापासून दूर राहत आपले ध्येय पार करताना आई-वडील, गुरुजन, जन्मभूमी व देशाला विसरू नका, असे मुख्यध्यापक यु. एम. शिंदे यांनी सांगितले.
उपस्थितांचे स्वागत गणेश लडकत व प्राचार्य रामचंद्र वाघ यांनी केले.
सूत्रसंचालन सुषमा चव्हाण व आभार तानाजी गवळी यांनी मानले.