स्थैर्य, सोळशी, दि. २८: सध्या शेतकऱ्यांना विविध समस्यातून जावे लागत आहे. कोरोना मुळे अल्पभूधारक शेतकरी व पशुपालन करणारा शेतकरी यांच्या विविध समस्या पुढे आलेल्या आहेत. पशुपालन शेतकऱ्यांच्या सर्व समस्या जाणून घेवून त्याचे निराकरण करण्यासाठी आपण कटिबद्ध असून आगामी काळात सुद्धा पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य आपले राहणार आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती मंगेश धुमाळ यांनी केले.
कोरेगाव तालुक्यातील सोळशी व करंजखोप येथे पशुपालन शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. त्या वेळी धुमाळ बोलत होते. या कार्यक्रमास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक बाळासाहेब सोळस्कर, सतीश धुमाळ, गुलाबराव जगताप यांच्यासह पशुपालक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
शेतीला जोडधंद्याची जोड दिल्याशिवाय विकास होत नाही, हे आता अनेक शेतकऱ्यांना लक्षात येऊ लागले आहे. आर्थिक विकासासाठी शेतीला पूरक विविध जोडधंदे शेतकऱ्यांनी सुरू करत आहेत. पशुपालन, मत्स्यपालन, मधमाशी पालन अशा कितीतरी व्यवसायांची नावे जोडधंदा म्हणून सांगता येतील. पशुपालन हा शेती व्यवसायाला पूरक असा जोडधंदा आहे. पशुपालन यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आर्थिक फायदा होतो. पशुपालन धंदा हा दुग्ध उत्पादनावर अवलंबून आहे. त्यामुळे वाढवून दूध उत्पादनासाठी काय करता येईल, याची माहिती असणे फार आवश्यक असते. असेही सातारा जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती मंगेश धुमाळ यांनी स्पष्ट केले.