दैनिक स्थैर्य । दि. २७ डिसेंबर २०२१ । मुंबई । दारूमुळे जैविक म्हणजेच शरिराची अपरिमित हानी होते व मनावरही तितकाच गंभीर परिणाम होतो. मात्र ही हानी तेवढ्यापुरतीच मर्यादित न राहता नातेसंबंधदेखील पार विस्कळीत होतात. परिणामी, आधी कुटुंबापासून व नंतर समाजापासून मद्यपीडित तुटतात आणि त्यानंतर निरनिराळ्या समस्यांच्या गर्तेत ते खोल रुतत जातात. जगातील आरोग्याशी संबंधित बहुतांश नामांकित संस्थांनी, ‘मद्यपानाचे व्यसन हा एक आजार’ असल्याचे म्हटले आहे. त्यातही अनुवंशिकतेतून हा आजार बळावतो, असेही समोर येत आहे. मद्यपान करणाऱ्या सर्वांनाच मद्यपानाचे व्यसन जडत नाही, तर त्यातील ८ ते १० टक्के मद्यपींनाच हे व्यसन जडते, हे पुरते सिद्ध झाले आहे. मेंदुतील विशिष्ट जनुकीय रचना-स्थिती ही या आजाराला कारणीभूत ठरते आणि अशाच व्यक्ती व्यसनी होतात. एखादी व्यक्ती व्यसनी होण्यामध्ये ४० टक्के जीन्स व ६० टक्के परिस्थिती कारणीभूत ठरते, असे उदगार ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ आशिष देशपांडे यांनी व्यक्त केले.
व्यसनातून मुक्त होऊन गेली ३० वर्षे व्यसनमुक्ततेसाठी विनामोबदला कार्य करणाऱ्या रमेश सांगळे यांच्या ‘आजचा दिवस फक्त’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच त्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, मिरॅकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष मनराय, भाजपा युवामोर्चा दक्षिण मुंबई अध्यक्ष सन्नी सानप, मैत्री प्रकाशनाच्या मोहिनी करांडे, अजय चौरासिया महामंत्री मलबार हिल,शांता दुर्गा चॅरिटेबल ट्रस्टचे सहसचिव भूषण जाक हे उपस्थित होते.त्यांनीही या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ देशपांडे पुढे असेही म्हणाले की, कामाच्या ठिकाणी गैरहजेरीचे तब्बल ४० टक्के कारण हे मद्यपान असून, दोन तृतीयांश घरतुगी हिंसा व एक तृतीयांश आत्महत्या या मद्यपानाच्या प्रभावाखाली होतात. धक्कादायक कारण म्हणजे १९९० मध्ये मद्याचा पहिला घोट घेण्याचे वय हे १९ होते, २००५ मध्ये ते १६ वर आले आणि आता २०१८ मध्ये हे वय १३-१४ वर्षांपर्यंत आले आहे. याचा गांभीर्याने विचार करुन कृती करण्याची वेळ आली आहे, असे मत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे (मुंबई) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आपल्याला व्यसनाधीनते बद्दल सामीलकी दाखवून चालणार नाही तर बांधीलकी दाखवायला पाहिजे. मद्याचा पहिला घोट घेणाऱ्यांचे वय आता १३-१४ पर्यंत खाली आले आहे आणि जेवढ्या कमी वयामध्ये मद्यपान सुरू होते, तेवढे त्याचे घातक परिणाम होतात. या पुस्तकाचे खरे यश हे पुस्तक विकलं जाण्यात नाही तर वाचल्यानंतर अस्वस्थ होत कुणाला काहीतरी मिळण्यासारखे आहे. व्यसनाधीन माणसाला किंवा त्यांच्या पालकांना अंधारात ध्रुव ताऱ्यासारखे दिशा देण्याचे काम हे पुस्तक करणार आहे.आपण सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न केला तर हे पुस्तक पैशाच्या यशामध्ये न मोजता त्याच्या कामाच्या यशामध्ये मोजली जाईल आपण जो टॅक्स भरतो त्याच्या पैकी ८० टक्के टॅक्स हा स्वास्थावर खर्च होतो मित्रांनो यातील ८० टक्के खर्च हा दारू आणि व्यसन याच्याशी निगडित आहे, या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या आल्या आणि समाजातली नशा संपली तर हा पैसा शिक्षणासाठी इतर विकासाबाबतीतल्या गोष्टींसाठी खर्च होईल अशी अपेक्षा रास्त नाही का ?
कार्यक्रमात शाहीर विजय कदम यांनी व्यसनमुक्तीविषयी विडंबन गीत सभिनय सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण खटावकर तर आभार प्रदर्शन आदेश गुरव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ताराम गवस, प्रशांत भाटकर, नारायण परब, सुदेश दुखंडे यांनी विशेष प्रयत्न केले.