
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे फलटणमध्ये ९ मार्चपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. यामुळे हॉटेल आणि केटर्स व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, पुरवठा विभागाकडून हॉटेल्सची कडक तपासणी सुरू आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १२ मार्च : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका आता फलटणच्या स्थानिक बाजारपेठेला बसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे केंद्र सरकारने ‘अत्यावश्यक वस्तू कायदा’ लागू केला असून, परिणामी ९ मार्चपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे फलटणमधील हॉटेल, बेकरी, मेस आणि केटर्स व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले असून, पुढील सूचना येईपर्यंत हीच स्थिती कायम राहणार असल्याने शहरातील खाद्य उद्योगांना याचा मोठा फटका बसणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
आर्थिक गणित कोलमडले; व्यावसायिक हतबल
९ मार्चपासून गॅस पुरवठा थांबल्याने फलटणमधील अनेक छोट्या व्यावसायिकांकडे असलेला सिलिंडरचा साठा आता संपत आला आहे. नवीन सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल मालक आणि खाऊ गल्लीतील स्टॉलधारक हतबल झाले आहेत. व्यावसायिक गॅस उपलब्ध नसल्याने दुकाने कशी चालवायची आणि कामगारांचे पगार कसे करायचे, असा संतप्त सवाल फलटणमधील उद्योजकांकडून विचारला जात आहे. मार्चअखेरची वसुली आणि बँकांचे हप्ते भरायचे असतानाच हा गॅस पुरवठा खंडित झाल्याने व्यावसायिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. केवळ हॉटेलच नव्हे, तर लग्नसराईच्या ऐन हंगामात केटर्स व्यावसायिकांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. गॅसअभावी अनेक मोठे समारंभ आणि घरगुती मेस अडचणीत आल्या आहेत.
पुरवठा विभागाची हॉटेल्सवर करडी नजर; व्यावसायिकांचा आता अत्याधुनिक चुलींचा आधार
गॅस पुरवठा बंद झाल्याच्या या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, शासनाचे आदेश प्राप्त होताच पुरवठा विभागाचे अधिकारी ॲक्शन मोडवर आले आहेत. हे अधिकारी शहरातील विविध हॉटेल्स आणि खानावळींमध्ये प्रत्यक्ष जाऊन व्यावसायिक गॅसऐवजी घरगुती गॅस सिलिंडरचा बेकायदेशीर वापर होत आहे का, याची कडक तपासणी करत आहेत. दुसरीकडे, गॅसटंचाईवर मात करण्यासाठी आणि आपला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आता काही हॉटेल चालकांनी अत्याधुनिक चुलींचा (शेगडी) आधार घेतला आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे कमी जागेत चूल चालवणे शक्य होत असले तरी, व्यावसायिक गॅसच्या तुलनेत यावर अन्नपदार्थ बनवण्यास अतिशय जास्त कालावधी लागत आहे. त्यामुळे ग्राहकांना वेळेवर सेवा देण्यात अडचणी येत असून, हॉटेल व्यावसायिकांचा मोठा वेळ यात खर्ची पडत आहे.
प्रशासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत हीच विदारक परिस्थिती राहणार असल्याने, फलटणमधील हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या या उद्योगांची चाके आता थांबण्याची शक्यता आहे. यावर स्थानिक प्रशासन व्यावसायिकांसाठी काही पर्यायी व्यवस्था करणार का, याकडे फलटणमधील सर्व व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
