दैनिक स्थैर्य । दि. १९ एप्रिल २०२३ । सातारा । भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयामार्फत आयोजित ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ (बेस्ट टुरिझम व्हिलेज) स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील पर्यटनक्षम गावांनी ५ मे पर्यंत ऑनलाईन नामांकन दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
देशातील ग्रामीण पर्यटनाचा विकास आणि प्रोत्साहनासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत राष्ट्रीय धोरण तयार केले आहे. त्याअनुषंगाने ग्रामीण पर्यटनाचे उत्कृष्ट उदाहरण दाखवून देणाऱ्या गावाचा गौरव करण्यासाठी ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ स्पर्धा सुरू केली आहे. ग्रामीण विकास, समुदाय कल्याण आणि नैसर्गिक आणि सांस्कृतिक संपदेचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या गावांमध्ये स्पर्धात्मकता वाढीस लागावी, इतर गावांना प्रेरणा मिळावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा तीन टप्प्यात होणार असून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय या प्रत्येक टप्प्यावर ३ सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे निवडली जाणार आहेत. निवडण्यात आलेली गावे पुढील टप्प्यावरील स्पर्धेसाठी पुढे पाठवली जातील. या प्रकारे राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट पर्यटन गावांची निवड होईल. राष्ट्रीय स्तराव निवडण्यात आलेल्या प्रथम क्रमांकाच्या उत्कृष्ट पर्यटन खेड्याचे संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेद्वारे (युएनडब्ल्यूटीओ) घेण्यात येणाऱ्या ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ (बेस्ट टुरिझम व्हिलेज) स्पर्धेसाठी नामांकन पाठविण्यात येईल.
सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धेत भाग घेण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने विकसित केलेल्या https://nidhi.nic.in/BVC/AboutDetail.aspx या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी https://rural.tourism.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.
रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी: या स्पर्धेमुळे गावांमधील पर्यटनक्षमता राज्यासमोर, देशासमोर येणार असून ग्रामीण पर्यटनक्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना देशपातळीवर ओळख मिळणार आहे. पर्यटन सुविधांच्या विकासातून ग्रामीण विकास तसेच रोजगार निर्मितीला चालना मिळेल. गावांचा शाश्वत विकास आणि रोजगार निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ही स्पर्धा एक संधी आहे.