दैनिक स्थैर्य । दि. १९ एप्रिल २०२३ । मुंबई । मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे तसेच शिंदे-फडणवीस सरकारच्या लोकोपयोगी निर्णयांमुळे विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीकडील ओढा वाढला आहे, असे प्रतिपादन भारतीय़ जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बावनकुळे बोलते होते. खा.सुभाष भामरे, प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील , मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम प्रमुख नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. बावनकुळे यांनी सांगितले की नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार या डबल इंजिन सरकारमुळे राज्यातील विकास कामांना मोठा वेग मिळाला आहे. या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशाचा मोठा कार्यक्रम काही दिवसानंतर सटाणा येथे होणार आहे.
भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गट या तीनही पक्षातील कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. हे कार्यकर्ते कोणत्याही सत्तापदाच्या अपेक्षेने भारतीय जनता पार्टीत येत नसून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते भाजपामध्ये येत आहेत. बुथ पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश होत आहे, असेही श्री. बावनकुळे यांनी नमूद केले.
त्याआधी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात सटाण्याचे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यासह तेथील अकरा माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांचे स्वागत केले. दिनकर सोनावणे, मनोज वाघ, बाळू बाबुल, सोनाली बैताडे आदींचा यात समावेश होता. मालेगाव आणि मनमाड येथील कार्यकर्त्यांनीही यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला. खा.डॉ.सुभाष भामरे, आ.दिलीप बोरसे, आ. सीमा हिरे, जिल्हाध्यक्ष सुरेश नाना निकम, प्रदेश महामंत्री सर्वश्री विजय चौधरी, विक्रांत पाटील, संजय केनेकर आदी यावेळी उपस्थित होते.