दैनिक स्थैर्य । दि. १९ एप्रिल २०२३ । सातारा । राज्यात वाढत असलेल्या Seasonal Influenza आजार आणि कोविड-19 आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
कोविड-19 व Influenza ची लक्षणे ही श्वसन संस्थेशी निगडीत असून त्यामध्ये खोकला, श्वास घेणेस त्रास, निमोनिया, ताप इत्यादी प्राथमिक लक्षणे आहेत. कोविड-19 विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने हवेवाटे त्याचप्रमाणे शिंकणे, खेाकणे हस्तांदोलन इत्यादी कारणांमुळे होतो. या आजाराचे अनुषंगाने 50 वर्षावरील व्यक्ती, गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, कॅन्सर व किडनीचे आजार असलेले तसेच, ज्या नागरिकांना यापूर्वी कोविड-19 ची लागण होऊन गेलेली आहे (Post covid) अशा नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांनी वेळोवळी व जेवणांपूर्वी नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत, शिंकताना, खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, हस्तांदोलन टाळावे, चेहरा, नाक व डोळे यांना वारंवार हाताने स्पर्श करु नये आणि विशेष म्हणजे गरज नसतांना गर्दीचे व बंदिस्त ठिकाणी जाणे टाळावे.
शासनाच्या निर्देशानुसार या आजाराची व्याप्ती वाढू नये, यासाठी जिल्हयात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व प्रकारची शासकीय/निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविदयालये तसेच गर्दीच्या ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी (आठवडे बाजार, एसटी स्टँण्ड परिसर, यात्रा, मेळावे, लग्नसमारंभ, मोठया प्रमाणात लोक एकत्र येण्याची ठिकाणे) सर्व नागरिकांनी आणि सर्व शासकीय विभागातील अधिकारी /कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वयंस्फूर्तीने दैनंदिन मास्कचा वापर करावा असे आवाहनही श्री. जयवंशी यांनी केले आहे.