दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । फलटण । नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे सुमारे 35 लाख रुपयांचे वीज बिल थकवल्याने महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांच्या पथकाने वेळोवेळी फलटण नगर परिषदेला थकबाकी भरण्यासाठी नोटीस बजावूनही ती न भरल्याने मंगळवार, दि. 28 रोजी पाणी पुरवठा विभागाची वीज बंद करण्याची कारवाई महावितरणने केली होती, तेंव्हा सी. ओ. साहेब आपलं हे वागणं बरं नव्हं, काल जे बोलला ते खरं नव्हं, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांनी लगावला आहे.
इतिहासात प्रथमच वीज बंद करण्याची नामुष्की फलटण नगरपरिषदेवर ओढवली होती. त्या बाबतीत एक जबाबदार अधिकारी प्रशासक म्हणून आपण नागरिकांच्या झालेल्या गैरसोयी बद्दल माफी मागणे, दिलगिरी व्यक्त करणे हे अपेक्षित असताना आपण धांदात खोटे बोलून असे काही घडलेच नाही असे खोटे भासवून नागरिकांची दिशाभूल करत आहात. स्वतःच अफवा पसरवत आहात हे खूपच दुर्दैवी आहे, असेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
हे आपण सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी केलेले कृत्य अत्यंत पक्ष:पातीपणाचे असेच आहे. यासाठी अनेक लाचार मंडळी बंगल्यावर ठाण मांडून असतांना आपण ही तसदी कशाला घेतली हे आता एव्हाना सर्व फलटणकरांना समजले आहे. आपण शासनाचे विश्वस्त या नात्याने फलटण नगर परिषदेचे सध्या प्रशासक म्हणून काम पाहत असताना आपले असे वागणे प्रशासक या पदाला शोभणारे नाही. आपण सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे असताना सत्ताधाऱ्यांची भलावण केल्यामुळे आपल्या एकूणच विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असेही यावेळी जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांनी स्पष्ट केले.