सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ मे २०२२ । मिरज । मिरज येथील यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार समितीच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा यावर्षीचा यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना जाहीर झाला आहे. रविवार १५ रोजी दुपारी     १ .३० वाजता मिरजच्या बालगंधर्व नाट्यगृहात या पुरस्काराचे वितरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे. समितीचे सचिव विठ्ठलराव पाटील यांनी ही माहिती दिली.
या समितीच्यावतीने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान यासह विविध पदांवर काम करून स्वच्छ चारित्र्याचा वस्तूपाठ देशासमोर ठेवणारे धुरंदर नेते यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा मिरज येथे महाराष्ट्र – कर्नाटक राज्याच्या सीमेवर उभारण्यात आला आहे. या माध्यमातून यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्यावतीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे कार्य, वैचारिक वारसा पुढे नेणार्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात येते. आतापर्यंत माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,  दिवंगत आर.आर. पाटील, वाशिमचे चंद्रकांत ठाकरे, दिवंगत विष्णूअण्णा पाटील, कृषी तज्ज्ञ आप्पासाहेब पवार आदींना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
रविवारी होणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार श्रीमती सुमनताई पाटील, आमदार मानसिंग नाईक, आमदार विक्रम सावंत यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या अध्यक्षा श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र मेथे, सचिव विठ्ठल पाटील यांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!