पुण्या-मुंबईत लॉकडाऊन वाढण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, मुंबई,दि. 29 : लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपत आला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच असल्यामुळे दहा जूनपर्यंत देशातील लॉकडाऊन वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनचे स्वरूप ठरवण्याचे, त्यात वेगवेगळ्या भागासाठी निर्बंध शिथिल वा कठोर करण्याचे सर्वाधिकार राज्यांकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संपादकांच्या बैठकीत आणखी काही काळ राज्यातील लॉकडाऊन वाढण्याचे संकेत दिले.

चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनची मुदत रविवारी संपत आहे. मात्र सव्वादोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही देशातील कोरोनाबधितांची व मृतांची संख्या वाढतेच आहे. त्यामुळे यापुढे लॉकडाऊन वाढवायचे की नाही असा प्रश्‍न केंद्र सरकारसमोर आहे. लॉकडाऊनबाबत राज्यांचे मत समजून घेण्यासाठी गृहमंत्री अमित शाह गेले दोन दिवस राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करत आहेत. मुख्यमंत्र्यांची भूमिका समजून घेतल्यानंतर अमित शाह यांनी आज सकाळी पंतप्रधान मोदी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. केंद्र सरकारने नेमलेल्या दोन उच्चस्तरीय समित्यांनी सरसकट लॉकडाऊन सुरू न ठेवता कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेल्या राज्यांपुरते किंवा त्या भागात लॉकडाऊन सुरू ठेवावे अशी शिफारस केली आहे. केंद्र सरकार शनिवारी याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात काय होणार याबाबत कुतूहल आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रमुख वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांच्या संपादकांची बैठक दादर येथील शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारकात बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात काही काळ लॉकडाऊन सुरु राहील असे संकेत दिले. मुंबई, पुण्यासह रेड झोनमध्ये असलेल्या राज्यातील मोठ्या शहरातील स्थिती सुधारत असली तरी अजूनही पुर्णतः नियंत्रणात आलेली नाही. तसेच

मुंबई-पुण्यापासून गावी गेलेल्या लोकांमुळे काही जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या वाढली आहे. या स्थितीत एकदम सूट देता येणार नाही. त्यामुळे लॉकडाऊन सुरु ठेऊन ज्या जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात आहे त्या जिल्ह्यातील निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय होऊ शकेल असे संकेत मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रसारमाध्यमांची भूमिका मोठी असून सतर्कतेबरोबरच लोकांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांनी करावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सोशल मीडियावरून प्रसारित होणार्‍या फेक न्युज बद्दल लगेच लोकांना माहिती द्यावी. सरकारकडूनही प्रसारमाध्यमांना सतत अधिकृत माहिती दिली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!