‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानांतर्गत विडणी गावात स्वच्छता मोहीम; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


स्थैर्य, विडणी, दि. २५ सप्टेंबर : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ आणि ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत, ‘स्वच्छता हीच सेवा’ या देशव्यापी मोहिमेला अनुसरून विडणी (ता. फलटण) येथे स्वच्छता श्रमदान अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गावाचा परिसर स्वच्छ केला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर हा दिवस ‘स्वच्छ भारत दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निर्देशानुसार विडणी ग्रामपंचायतीने ही स्वच्छता मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत गावातील रस्ते, शाळा व मंदिर परिसर, अंगणवाड्या, गटारे आणि इतर सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई करण्यात आली.

यावेळी आपले गाव स्वच्छ, सुंदर व हरित करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सरपंच सागर अभंग यांनी दिली. “विडणी गावच्या लोकसंख्येइतकीच देशी झाडे लावण्याचा आमचा मानस आहे,” असे त्यांनी सांगितले.

या स्वच्छता अभियानात सरपंच सागर अभंग, उपसरपंच सौ. मनीषा नाळे, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील सौ. शितल नेरकर, ग्रामविकास अधिकारी अंकुश टेंबरे, शाळांचे शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच विविध मंडळांचे पदाधिकारी, शालेय विद्यार्थी, महिला व युवक बहुसंख्येने सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!