प्रदुषण रोखण्यासाठी मुंबईप्रमाणेच संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियान राबवणार:मुख्यमंत्री शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. 01 जानेवारी 2024 । मुंबई । प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वच्छ माझा महाराष्ट्र या महास्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, माजी आमदार राज पुरोहित, उद्योगपती नादीर गोदरेज, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, डॉ. सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.

महास्वच्छता अभियान राज्यभर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियानास प्रारंभ केला. त्यानंतर हे अभियान मुंबई शहरात राबवले. या अभियानाचा परिणाम खूप चांगला आहे. त्यामुळे हे अभियान आता राज्यात सर्वत्र राबविण्यात येणार आहे. स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियानासाठी एक कार्य प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. या अभियानात लोकांना सहभागी करून घेण्यात यावे.

स्वच्छता अभियान लोकचळवळ झाली

मुंबई शहरात सुरू केलेल्या या अभियानात शाळा, महाविद्यालय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध प्रतिष्ठान सहभागी होत आहेत. यामुळे या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप येत आहे. मुंबई डीप क्लीन ड्राईव्हचे एक मॉडेल तयार झाले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

मुंबईत अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविणार

विकास प्रकल्पामुळे तोडाव्या लागलेल्या झाडांचे पुनर्रोपण करणार आहे. मुंबईत रिकाम्या जागेवर झाडे लावली जाणार आहेत. मुंबई शहरात अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबविण्यासाठी विचार सुरू आहे. ठाणे शहरातील कोपरी परिसरापासून गायमुख पर्यंत ग्रीन पॅच तयार केला जात आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

स्वच्छता कर्मचारी मुंबईचा खरा हिरो

मुंबई शहरातील स्वच्छता कर्मचारी खरा हिरो आहे. कारण ते सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतात. मुंबई स्वच्छ ठेवतात. या कर्मचार्‍यांच्या वसाहती स्वच्छ ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सफाई कर्मचारी यांना विमा सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सफाई कर्मचारी यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवा, लोकप्रतिनिधींना सूचना

मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र नेले जाणार आहे. हे अभियान आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध लोकप्रतिनिधींना केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार विद्या ठाकूर, आशिष शेलार, यामिनी जाधव, भारती लव्हेकर, प्रकाश सुर्वे, मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, कालिदास कोळंबकर यांच्याशी संवाद साधला.

तत्पूर्वी महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी मुंबई शहरात राबवल्या जात असलेल्या डीप क्लीन ड्राईव्हबाबत माहिती दिली. यावेळी स्वच्छता कर्मचारी संदीप पवार, शीला जाधव, मच्छिंद्र सावंत, स्वप्नील शिरवाळे, अर्चना मोरे यांचा सत्कार करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी आभार मानले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. स्वच्छता कामात उपयोगी ठरणार्या वाहनांच्या संचलनास हिरवा झेंडा दाखवून सुरवात केली.


Back to top button
Don`t copy text!