दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑगस्ट २०२२ । सातारा । मुख्यमंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर अनेक जिल्ह्याना भेटी दिल्या यावेळी विविध मान्यवरांकडून माझा सत्कार करण्यात आला पण माझ्या जन्मभूमीतील झालेला माझा सत्कार ही आनंदाची बाब असून जनतेच्या हिताचे निर्णय घेतांना प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
तापोळा ता. महाबळेश्वर येथे तापोळा ग्रामस्थांच्यावतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचासहकुटूंब नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. शिंदे बोलत होते. याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्यासह तापोळा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य शासनाने शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेतले आहेत. अतिवृष्टीमुळे तीन एकरांपर्यंत झालेल्या पिकांची नुकसान भरपाई दुपटीने देण्यात येणार आहे. राज्याचा सर्वांगीण
विकास करण्याचा प्रयत्न असणार असून राज्यात मोठे उद्योग उभारणीवर भर देण्यात येणार आहे. महाबळेश्वर-तापोळा रस्त्यासह पश्चिम महाराष्ट्र कोकणाला कसा जोडला जाईल यासाठी दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम केली जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरी सत्कार प्रसंगी सांगितले.