स्थैर्य, सातारा, दि. १०: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व दस्त नोंदणीच्या सोयीसाठी विभागात ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत. सेवांचा नागरिकांनी वापर करुन दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने सेवा व सुविधांचा वापर करावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी बी.के. खांडेकर यांनी केले आहे.
नागरिकांनी या विभागाच्या संकेतस्थळावर असलेल्या दस्त नोंदणीकरिता पीडीई द्वारे डेटा एंट्री करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापुढे दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एंट्री किंवा दुरुस्त्या पूर्णपणे थांबविण्यात येत आहेत. नागरिकांनी पीडीई डेटा एंट्री करुन दस्त नोंदणीसाठी या विभागाच्या संकेतस्थळावर eStep-in या प्रमाणालीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेली सोयीची वेळ ऑनलाईन आगाऊ बुक करुन किंवा कार्यालयीन दूरध्वनी,समक्ष संपर्क साधून वेळ आरिक्षित केली नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही याची नोंद घ्यावी. नागरिकांनी दस्ताचे निष्पादन घरी किंवा कार्यालयाच्या बाहेर करावे व प्रत्येक व्यक्तीने सह्यांसाठी स्वत:चे पेन आणावे एकच पेन एकमेकांत वापरु नये, आरक्षित वेळेलाच कार्यालयात हजर रहावे, मास्क लावल्या शिवाय कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी. विभागाच्या संकेतस्थळावर लिव्ह ॲन्ड लायसन्स ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह ॲन्ड लायसन्स दस्ताची कार्यालयातील नोंदणी (फिजीकल रजिस्ट्रेशन) पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात येत आहे, असेही मुद्रांक जिल्हाधिकारी श्री. खांडेकर यांनी कळविले आहे.