स्थैर्य,सोलापूर, दि. 26: देशात तयार होणा-या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी आज येथे केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, सोलापूर यांच्यावतीने आयोजित ‘कोविड-१९ लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत’ या विषयावर कोरोना लसीकरण मल्टी मीडिया मोबाईल व्हॅनचा उदघाटन प्रसंगी श्री जाधव बोलत होते. यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी रविंद्र राऊत, जिल्हा आरोग्य कार्यालयाचे माध्यम समन्वय अधिकारी रफीक शेख आदि उपस्थित होते.
राज्यात सर्वत्र कोरोनाच्या नवीन रुग्णामध्ये पुन्हा वाढ होत आहे. या पार्श्वभुमीवर कोरोनावर मात करण्यासाठी मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर पाळणे, या त्रिसुत्रीचा प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे देशांतर्गत तयार झालेल्या कोरोना लसीकरण मोहिमेत अफवांवर विश्वास न ठेवता सहभागी व्हावे, असे आवाहन श्री जाधव यांनी यावेळी केले.
सदरील चित्ररथाची निर्मिती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुण्यातील रिजनल आऊटरीच ब्युरोने तयार केली असून यामध्ये जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. ही मोबाईल व्हॅन दिनांक २६ फेब्रुवारी ते ७ मार्च, २०२१ पर्यंत जिल्हयातील तालुका मुख्यालयात फिरणार असून शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ, बस स्थानक परिसरात जनजागृती करण्यात येणार आहे. याबरोबर जयभवानी सांस्कृतिक कला पथक व स्वरसंगम कला व सांस्कृतिक मंडळ लोक कलाच्या माध्यमातून जनजागृती करणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सतीश घोडके यांनी केले. यावेळी शाहीर गोरे व सहकलाकारांनी पोवाडयाच्या माध्यमातून जनजागृतीपर गीतगायन सादर केले.