घातक प्रवृत्तींना पाठीशी घालणार्या लोकांना नागरिकांनी खड्यासारखे वगळावे : जेष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ डिसेंबर २०२१ । फलटण । ‘‘भारतीय स्वातंत्र्य असो किंवा शहीदांचे बलिदान असो; अशा ऐतिहासिक व भावनिक प्रसंगाबद्दलसुद्धा काही लोक टिंगल टवाळीची भाषा करतात. कंगना राणावत, विक्रम गोखले यांसारख्या कलावंतांनी इतिहास समजून न घेता भारतीय स्वातंत्र्याला ‘भीक’ असा शब्द वापरुन स्वातंत्र्य सैनिकांचा नीच पातळीवर घोर अपमान केला आहे. अशा लोकांवर केंद्र व राज्य शासनाने आपणहून देशद्रोहाचे गुन्हे दाखल करायला हवे होते. त्यामुळे एकीकडे ‘आझादी का अमृतमहोत्सव’ म्हणणार्‍या आणि दुसरीकडे अशा घातक प्रवृत्तींना पाठीशी घालणार्‍या लोकांना, संघटनांना, पक्षांना देशाचा अभिमान असणार्‍या सुजाण नागरिकांनी खड्यासारखे वगळावे, हीच खरी हुतात्म्यांना, शहीदांना योग्य आदरांजली ठरेल, असे विचार महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.

26/11 च्या मुंबईवरील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अप्रतिम शौर्य दाखवून शहीद झालेल्या अशोक कामटे, हेमंत करकरे, विजय साळसकर या योद्ध्यांना आदरांजली व भारतीय संविधान दिन कार्यक्रम येथील राष्ट्रीय एकात्मता विचार मंच, जनशक्ती युवा विकास प्रतिष्ठान व लोकमत प्रतिष्ठानच्यावतीने समाजसेवक अमीरखान मेटकरी यांनी आयोजित केला होता. त्यावेळी बेडकिहाळ बोलत होते. अध्यक्षस्थानी महात्मा शिक्षण संस्थेचे प्रमुख तथा पत्रकार दादासाहेब चोरमले होते.
प्रारंभी संयोजक अमीरखान मेटकरी यांनी गेली 13 वर्षे होत असलेल्या या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देवून उपस्थितांचे स्वागत केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व फलटण संस्थानचे अधिपती कै.श्रीमंत मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या पुतळ्यास उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर शहीद करकरे, कामटे, साळसकर यांच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तसेच ‘कोरोना’ काळात विशेष कार्य करणार्‍या शासकीय अधिकारी, जवान, पोलीस अधिकारी, नागरिक यांचा ‘कोवीड योद्धा’ म्हणून सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.

‘‘अमीरखान मेटकरी व त्यांचे सहकारी दरवर्षी असा महत्त्वाचा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा कार्यक्रम आयोजित करीत असल्याबद्दल त्यांना फलटण शहरातर्फे धन्यवाद देऊन’’, आपल्या अध्यक्षीय भाषणात दादासाहेब चोरमले म्हणाले, ‘‘अशा भावपूर्ण व देशभक्तीच्या कार्यक्रमांना शहरातील सर्व क्षेत्रातील नागरिक व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहायला हवे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा अर्थ घराघरात समजावून सांगायला हवा.’’

‘‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सामान्य व श्रीमंतांना लोकशाहीचा समान अधिकार दिला. पण, त्याचा योग्य वापर न झाल्याने या देशात सामान्य, कष्टकरी, दलित, पददलित, कामगार, शेतकरी यांचे शोषण अजूनि थांबले नाही. ही अन्यायाची दरी नष्ट करण्यासाठी आजही आंबेडकरांचे विचार प्रखरपणे राबविणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले पाहिजेत’’, असे आग्रही प्रतिपादन साहित्यिक तानाजी जगताप यांनी केले.

‘‘संविधान, कायदे याचा अर्थ सामान्यांपर्यंत पोचविण्याचे काम आपण विविध संघटनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर केले पाहिजे. हुतात्मे व शहीद यांचे कार्य शाळा, महाविद्यालयातून नव्या पिढीसमोर आणले पाहिजे,’’ असे मत अ‍ॅड.डी.जे.शिर्के यांनी व्यक्त केले.

प्रा.पी.बी.देवकाते यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. यावेळी लष्करी अधिकारी सुभेदार घोरपडे, माजी सैनिक हवालदार दादा भोसले, बसीर शेख, फलटण शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!