दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२१ । सातारा । जिल्ह्यात कोरोनांचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोनाचा नवीन ओमायक्रॉन व्हेरियंटला घाबरुन न जाता नागरिकांनी कोरोना संदर्भात शासनाने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतचा आढावा पालकमंत्री श्री. पाटील यांनी घेतला यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक अजय बोऱ्हाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला तरी नागरिकांनी दक्षता घ्यावी. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची माहिती केंद्र शासन राज्य शासनाला देत आहे. परंतु आपल्या घराशेजारी नागरिक परदेशातून आला असले तर त्याची माहिती तात्काळ जिल्हा प्रशासनाला द्यावी. कोरोनाचा नवीन ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका पाहता सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी बैठकीत केल्या.