मुख्याधिकारी अभिजित बापट यांना निवेदन देताना दीपाली गोडसे. शेजारी राजू गोडसे, बापूसाहेब पुतळे, अस्लम बागवान व इतर.
दीपाली गोडसे यांची मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
स्थैर्य, सातारा, दि. 14 : लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. काम नसल्याने खिशात पैसे नाहीत. अशा परिस्थितीत पालिकेने नोटीस बजावल्या आहेत. उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातल्या नागरिकांची घरपट्टी, पाणी पट्टी माफ करण्याची विनंती केली होती. त्यानुसार शहरातील सर्व नागरिकांची घरपट्टी, पाणी पट्टी माफ करावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष दीपाली गोडसे यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन देताना यावेळी दीपाली गोडसे, राजू गोडसे, बापूसाहेब पुतळे, अस्लम बागवान, चैतन्य मोहिते आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दीपाली गोडसे म्हणाल्या, ‘लॉकडाऊन झाल्यापासून आजपर्यंत अनेक व्यापार, उद्योग बंद आहेत. अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. तसेच अनेकांवर बेरोजगारीची कुर्हाड पडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय व गोरगरीब नागरिक आधीच आर्थिक अडचणीत असताना त्यांच्यावर आता नुकत्याच घरपट्टी व पाणीपट्टीच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. खा. उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी सातारा शहर नगरपालिकेच्या सर्व पदाधिकार्यांना घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यास सांगितले होते. पण अनेक दिवस हा विषय जनरल बॉडी होत नसल्यामुळे प्रलंबित आहे. तरी तातडीने लवकरच जनरल बॉडी घेऊन सातारा शहरातील मिळकतधारकांना घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी तसेच सातारा नगरपालिकेच्या स्वमालकीच्या व्यापारी संकुलामधील जे काही गाळेधारक आहेत, त्यांचे भाडे पूर्णपणे माफ करावे अथवा लॉकडाऊनच्या काळातील भाडे वसूल करण्यात येऊ नये,’ अशी मागणी केली आहे.
यावेळी अभिजित बापट याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असे सांगितले.