पाणी बचतीमध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा – सौ. सीता हादगे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,सातारा, दि.२ : माझी वसुंधरा अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम व पाणीबचत मोहिमेअंतर्गत आज सातारा शहरातील ४२ नळांना तोट्या बसवण्यात आल्या. पाणी बचाव मोहीमेत सातत्य राखले जाईल मात्र त्यामध्ये नागरिकांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे, अशी अपेक्षा पाणीपुरवठा सभापती सौ. सीता हादगे यांनी व्यक्त केली. या मोहिमेत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतल्यास यापुढे पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांना गुलाब पुष्प देण्याची वेळ येणार नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, माजी उपनगराध्यक्ष राजू भोसले यांच्या उपस्थितीत आज पहाटे प्रभाग क्रमांक १ मधून माझी वसुंधरा अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम व पाणी बचाव मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.सीता हादगे पुढे म्हणाल्या, प्रत्येकाच्या आयुष्यात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, तो अत्यंत महत्त्वाचा घटक समजला जातो. जिल्ह्यातील परिस्थिती पाहता तिकडे माण, खटावमध्ये दुष्काळ तर दुसरीकडे पाचगणी, महाबळेश्वर, जावली, पाटण या ठिकाणी अतिवृष्टी पाहायला मिळते. अतिवृष्टी आणि दुष्काळ या दोन्ही गोष्टींना सामोरे जाताना पाण्याचे महत्त्व अधोरेखित होते. दोनच महिन्यावर उन्हाळा येऊन ठेपल्यामुळे आपल्या सर्वांना पाणी बचतीचे धोरण अवलंबावे लागणार आहे. सातारा शहरातील बहुतांश नळांना तोट्या नसल्याच्या तक्रारी प्राप्त होताच खा. श्री. छ. उदयनराजे भोसले,  नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शिंदे, मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांच्या सहकार्याने सातारा शहरात माजी वसुंदरा अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम व पाणी बचाव मोहीम आज पासून हाती घेण्यात आली आहे. आज पहाटे शहरातील एकूण ४२ तोट्या नसलेल्या नळांना तोट्या बसवण्यात आल्या आहेत. ही मोहीम अशीच सुरु राहणार असली तरी शहरातील नागरिकांनी स्वयंपुर्तीने पुढे येऊन पाणी बचाव मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.सीता हादगे पुढे म्हणाल्या, शहरातील ज्या नागरिकांची नळ कनेक्शन बेकायदेशीर आहेत त्यांनी तात्काळ आपली नळकनेक्शन कायदेशीर करून घ्यावेत. अशा नागरिकांना तात्काळ कायदेशीर नळकनेक्शन करून देण्यास मी स्वता कटिबद्ध आहे. शहरात जेथे-जेथे नळाला तोट्या नाहीत, पाइपलाइनला गळती होत आहे असे निदर्शनात आल्यास तात्काळ ही बाब सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत ९७६२४११९१९ या मोबाईल क्रमांकावर माझ्या निदर्शनास आणून द्यावी. नळांना तोट्या बसवण्यासह तात्काळ गळती काढण्याचे काम हाती घेतले जाईल. नामदेववाडी झोपडपट्टी येथील महिलांशी पाणी बचतीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली असून पाणी कसे वाचवावे यासंदर्भात प्रबोधन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. पाणी बचाव मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यास यापुढे गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी करण्याची गरज निर्माण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!