
दैनिक स्थैर्य । 5 ऑगस्ट 2025 । कराड । कोल्हापूर येथील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये नेण्यात आले. या हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरमध्ये स्वाक्षरी मोहिम घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर व कोल्हापूरकरांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी कराडमध्येही स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली. येथील दत्त चौकात महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी कराडकरही एकवटले.चौकातील फलकावर कराडकरांनी स्वाक्षरी करून कोल्हापूरकरांच्या मागणीला पाठिंबा व्यक्त केला.
नांदणी (कोल्हापूर) मठातील महादेवी हत्तीणीचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप ’पेटा’ने केला. प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली, समितीने हत्तीणीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. त्यावर प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदवले होते.
गेल्या 35 वर्षांपासून महादेवी आणि कोल्हापूरकरांचा एक जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झाला आहे. महादेवी ही हत्तीन मसून नांदणीची लेक आहे, असे मानून कोल्हापूरकर हत्तीनीची सेवा करत होते. त्यामुळे महादेवी हत्तीनीला नांदणी मठाकडे परत पाठवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीबचतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, त्यामुळे नांदणी मठातील महादेवी हतीण वनताराकडे सोपवण्यात आली. हत्तीणीला परत आणण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी सह्यांची मोहिम राबवल्यानंतर कराडमध्ये देखील कोल्हापूरकरांच्या मागणीला पाठिंबा देत सह्यांची मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेला कराडकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
म्हसवड शहरात जैन समाज रस्त्यावर
नांदणी येथील महादेवी हत्तीनीला पेठा संघटनेने गुजरातला नेल्याने राज्यभरात संताप व्यक्त होत असून म्हसवड येथील जैन समाजाने एकत्र येत घटनेचा निषेध नोंदविला. याबाबब तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. जैन समाजाच्या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमासाठी नांदणी येथून महादेवीला पाचारण केले जायचे. शहरात प्रत्येकवेळी महादेवीचे धडाकेबाज स्वागत झाले आहे. मात्र अचानक महादेवीची रवानगी गुजरातला करण्यात आल्याने प्राणी प्रेमी नाराज झाले आहेत. महादेवीची जैन समाजाच्या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात हजेरी असते. वनताराने तिला नेल्याने समाजाने एकत्र येत शहरातून फेरी काढून या घटनेचा निषेध नोंदविला. याबाबत तहसिलदार बाबर यांना निवेदन दिले. यावेळी जैन समाजातील महिलांची संख्या लक्षणीय होती. शासनाने महादेवीला परत आणण्याची मागणी समाजाकडून करण्यात आली.