स्थैर्य, सातारा,दि. 20 : लॉकडाउन दरम्यान विनाकारण शहरात दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन फिरणाया वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई करून वाहने जप्त केली होती. ती वाहने दंडात्मक कारवाई करून परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे वाहने परत करण्याला सुरुवात केली. मात्र वाहने परत घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे सोशल डिस्टन्सिंग चे तीन-तेरा झाले असून नागरिकांनी सूचनांचे पालन न केल्याने पोलिसांना काही काळ काम थांबवावे लागले होते.
संपूर्ण देशात जिह्यात 23 मार्च रोजी लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता आस्थापना बंदी घालण्यात आली होती. तसेच जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्यात आला होता. या काळात विनाकारण आपली चारचाकी व दुचाकी वाहने रस्त्यावर घेऊन आलेल्या बेजबाबदार वाहनधारकांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करत वाहने जप्त केली होती. वाहने परत कधी मिळणार याबाबत संबंधितांना काळजी लागली. दरम्यान जिल्हा पोलिस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करून वाहने परत करण्याचा निर्णय घेतला होता. सोमवार दि. 18 रोजी वाहने परत करण्याची कामकाज सकाळपासून सुरू करण्यात आले होते. यावेळी वाहने परत घेण्यासाठी वाहनधारकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे वाहनधारकांच्या सातारा शहर पोलीस स्टेशन, वाहतूक विभागात रांगा लागल्या होत्या.
वाहनधारकांनी वाहने परत घेण्यासाठी एकच गर्दी केल्याने सोशल डिस्टन्ससिंगचा फज्जा उडाला होता. शहरातील विविध भागातून वाहनधारक आल्याने पोलिसांमध्ये ही कोरोना संसर्गाबाबत भीतीचे वातावरण होतं. पोलिसांनी तात्काळ वाहनधारकांना सोशल डिस्टनन्सिंग नियमाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. मात्र बेजबाबदार वाहनधारक एकच गर्दी करू लागले. वारंवार सूचना करूनही नियमांचे पालन न केल्याने नाईलाजाने पोलिसांना काम काही काळ थांबवावे लागले होते.