
स्थैर्य, खटाव, दि. 28 : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर खेड्यापाड्यात मुंबई-पुणे सह इतर राज्यातून येणार्या नागरीकांचा लोंढा वाढला आहे. यापैकी बहुतेक लोकांना होम क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. यापैकी एखादा तरी पॉझिटिव्ह रुग्ण असला तरी संसर्ग वाढण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने यापुढच्या काळात खटाव-माण तालुक्यात बाहेरुन येणार्या नागरीकांना होम क्वॉरंटाईन ऐवजी गावोगावच्या मंगल कार्यालयात क्वॉरंटाईन करावे, अशी मागणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केली आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना घार्गे म्हणाले, सद्या जिल्ह्याबाहेरुन येणार्या नागरीकांसाठी जिल्हा परिषद, माध्यमिक शाळा अथवा होम क्वॉरंटाईन असे दोन प्रकार आहेत. यापैकी अनेक गावात होम कॅरंटाईनलाच प्राधान्य दिले जात आहे. त्यातल्या त्यात गोरगरीब लोकांना शाळेचा पर्याय दिला जातोय. सर्वच शाळेत चांगल्या प्रकारच्या भौतिक सुविधा असतीलच असे नाही. त्यामुळे शाळेमध्ये क्वॉरंटाईन केलेल्या नागरीकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आपल्या कानावर अनेकवेळा येत असतात. तर होम क्वॉरंटाईन केलेले सर्व नागरीक नियमांचे पालन करतीलच असे नाही. शिवाय प्रत्येकाला 14 दिवस अलग राहण्यासाठी स्वतंत्र घर, खोली असेलच असे नाही. त्यामुळे एकाच घरात राहण्याचे प्रमाणही दिसून येते. तसेच जे लोक मुंबई, पुणे अथवा शहरात वास्तव्यास असतात त्यांचा घराबरोबर, गावावरही प्रभाव असतो. त्यामुळे त्यांना कोणी नियम, अटी शिकवायच्या असाही प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून हे प्रश्न टाळण्यासाठी गावोगावची मंगल कार्यालये क्वॉरंटाईन करण्यासाठी घेणे हा उत्तम पर्याय आहे. कोरोना आजारामुळे सद्या ऐन लग्न सराईचे दिवस असूनसुध्दा लग्न मालक मंगल कार्यालयाकडे फिरकत नाहीत. त्यामुळे मोठी भांडवली गुंतवणूक करणार्या मंगल कार्यालय मालकांना व्यवसाय नाही. तसेच कार्यालयात नागरीक क्वॉरंटाईन झाल्यास आचारी, स्वयंपाकी, स्वच्छता कर्मचारी यांनाही रोजगार उपलब्ध होवू शकतो. मात्र हे करत असताना लग्न कार्यालय मालकांनी भाड्याबाबत अडून न बसता योग्य तडजोडीने समन्वयाने काम करावे. तसेच भाड्याच्या खर्चासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल प्रशासन, आरोग्य प्रशासन व दानशूर नागरीकांनी एकमेकांच्या सहकार्याने मार्ग काढावा, अशी सूचनाही घार्गे यांनी केली आहे.