
स्थैर्य, 7 मार्च, सातारा : सुरूर-पोलादपूर या प्रमुख मार्गावरील रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे, तसेच महाबळेश्वर ते पाचगणी दरम्यान रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने संतप्त झालेल्या महाबळेश्वरकरांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. 8 मार्च रोजी संपूर्ण महाबळेश्वर शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय येथे आयोजित गावसभेत सर्वानुमते घेण्यात आला.
पेटिट ग्रंथालयाच्या मैदानावर प्रथमच महाबळेश्वरकरांच्यावतीने आयोजित या गावसभेत नगराध्यक्ष सुनील शिंदे, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी नगराध्यक्षा विमलताई पाटें, नगरसेवक तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत महाचळेश्वरच्या विविध प्रश्नांवर चर्चा करत नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
सुरूर ते पोलादपूर रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडे दहा वर्षासाठी हस्तांतरित करण्यात आला. डिसेंबर 2024 पासून सुरूर ते बाई या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले. मात्र, पसरणी घाटातील काम अपूर्ण असतानाच पाचगणी ते महाबळेश्वर या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. अनेक महिन्यांपासून काम संथ गतीने सुरू असल्याने पाचगणी ते महाबळेश्वर हा सुमारे 20 किमीचा रस्ता उखडलेला, खड्डेमय आणि धुळीने माखला आहे. यामुळे वाहनचालक, प्रवासी व पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे.
काही पर्यटकांनी तर या मागनि येणे टाळले असून त्यामुळे महाबळेश्वरच्या पर्यटनावर विपरीत परिणाम होतअसल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनाही या मागनि प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा सूर आळवण्यात आला. सभेत ठरवण्यात आलेल्या निर्णयानुसार दि. 8 मार्चला शहर बंद आंदोलन, त्यानंतर दि. 9 मार्च रोजी नगरपरिषद, तहसीलदार कार्यालय, वन विभाग, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस ठाणे येथे मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे.

