
स्थैर्य, दि.६: कोरोना दरम्यान 7 महिन्यांनंतर उघडण्यात येणाऱ्या मल्टिप्लेक्ससाठी सरकारने मंगळवारी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) जारी केली. 15 ऑक्टोबरपासून 50% क्षमतेने चित्रपटगृह उघडण्यास परवानगी असेल. मात्र यादरम्यान सामाजिक अंतर राखावे लागणार आहे. तसेच दोन लोकांमधील सीट रिकामे ठेवावे लागेल.
चित्रपटगृहात पॅकेज फूडला परवानगी असेल. फूट काउंटरवर ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करावे लागेल. थिएटरमध्ये अन्न वितरण परवानगी दिली जाणार नाही. योग्य व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल. एसीचे तापमान 23 डिग्रीच्या वर ठेवावे लागेल. ऑडिटोरियमच्या बाहेर प्रेक्षकांनी एकमेकांपासून 6 फूट अंतर ठेवणे आवश्यक आहे. यासोबत सरकारने आरोग्य सेतू अॅप वापरण्याचा सल्ला देखील दिला आहे.
शोच्या आधी किंवा मध्यांतराआधी किंवा नंतर कोरोना जनजागृतीसाठी 1 मिनिटांची चित्रफित दाखवणे आवश्यक असेल. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी SOP जारी करत म्हटले की, मल्टिप्लेक्सचे तिकिट ऑनलाइन बुक करण्यावर भर दिला जाईल. मात्र सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये तिकिटाची खिडकी खुली राहील.