चित्राताई वाघ यांचे आरोप अपुर्‍या माहितीवरून.. फारसे महत्त्व देत नाही ना. शंभुराज देसाई यांचे प्रत्युत्तर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २ जुलै २०२१ । सातारा । भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी सातारा येथे गृह विभागाच्या कामकाजावर जे आरोप केले आहेत, ते अपुर्‍या माहितीच्या आधारवर आहेत. वास्तविक महिला उपशिक्षिकेने तक्रार दिल्यानंतर संबंधित गटशिक्षणाधिकार्‍याला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी यात कोणतीही ढिलाई केली नसून तपासात कोणतीही त्रुटी न राहता कठोरात कठोर शासन देण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन गृहराज्य मंत्री ना. शंभुराज देसाई यांनी केले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गृहखाते 24 बाय 7 कार्यरत आहे. मात्र, भाजपाला महाविकास आघाडीची बदनामी करण्याव्यतिरिक्त कोणतेही काम उरले नसल्याने असे आरोप होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

सातारा येथे भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेवून राज्यात महिलांच्या अत्याचारांमध्ये वाढ झाली असताना गृहखात्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला होता. तसेच महिला शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी करणार्‍या गटशिक्षणाधिकारी धुमाळ याचे निलंबन झाले नसल्याने पालकमंत्री व गृहराज्य मंत्र्यांवर सडकून टिका केली होती. यानंतर सायंकाळी ना. शंभुराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेवून याप्रकरणातील पोलिस दलाची भुमिका मांडली व चित्रताई वाघ यांच्या आरोपांना उत्तर दिले.
ना. शंभुराज देसाई म्हणाले, गटशिक्षणाधिकारी धुमाळ याच्याविरोधात संबंधित महिलेने विशाखा समितीकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्याची विशाखा समितीमार्फत चौकशी करण्यात आली. धुमाळ याचे स्टेटमेंट अद्याप रेकॉर्ड केले नाही. दरम्यान, 26 जून रोजी संबंधित शिक्षिकेने सातारा येथे पोलिस ठाण्यात धुमाळ याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर हा विषय गृहविभागाकडे आला. पोलिसांनी धुमाळला दि. 27 रोजी ताब्यात घेतल्यानंतर त्याने तब्येत बरी नसल्याचे कारण सांगितले. त्यामुळे त्यास 1 दिवस जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्याची तपासणी करण्यात आली. तो ठीक असल्याचा अहवाल येताच पोलिसांनी त्यास अटक करून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास जामिन मिळाला आहे. तथापि, या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात कोणतीही त्रुटी न राहणार नाही, याची दक्षता घेतलेली आहे. सहायक पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या देखरेखीखाली एपीआय चौधरी तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार योग्य रितीने काम करत आहे. परंतु, भाजपला सरकारची बदनामी करण्याव्यतिरिक्त काही कामच उरलेले दिसत नाही. सातारा जिल्ह्यातील गुन्ह्यांची आकडेवारी पाहता महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी झाले आहे. देशातील कायदा सुव्यवस्था राखण्याला ठाकरे सरकारचे प्रथम प्राधान्य आहे. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात मी 13 जिल्ह्याचे दौरे करून फिल्डवर काम केले आहे. या लॉकडाऊनमध्येही 9 जिल्ह्यात जावून पोलिस दलातील बैठका, जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी फिल्डवर काम केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात येवून चित्राताई वाघ जे बोलल्या ते अपुर्‍या माहितीच्या आधारे बोलल्या. त्याला आपण फारसे महत्त्व देत नाही, टोलाही ना. देसाई यांनी लगावला. दरम्यान, कृष्णा कारखान्यातील निकालानंतर विजेत्यांच्या समर्थकांनी जल्लोष करताना सोशल डिस्टनिंगचे उल्लंघन केल्याबाबत माहिती घेवून गुन्हे दाखल करण्याच्या सुचना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पवारसाहेबांवर टिकेची ती रिअ‍ॅक्शन
शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. महाविकास आघाडीचे ते मार्गदर्शक आहेत. पवारसाहेबांनी देशाच्या कषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. अशा सुर्यासारखे तेजस्वी व्यक्तीमत्त्वावर टिका करण्याअगोदर पडळकरांनी अगोदर स्वतः कोण आहोत ते जरा तपासावे. जशी अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन असते तसेच पवार साहेबांवर आरोप झाल्यानंतर पडळकरांच्या कारच्या काचा साहेबांवर प्रेम करणार्‍यांनी फोडल्या, असेही ना. देसाई म्हणाले.

बंडातात्यांनी पायी वारीचा आग्रह धरू नये
सध्या कोवीडच्या पार्श्‍वभूमीवर पायी वारीला मनाई केली आहे. तरीही बंडातात्या कर्‍हाडकर हे आळंदी येथे पायी वारीसाठी गेले असल्याचे विचारताच ना. देसाई म्हणाले की, कमी वारकर्‍यांसह पायी वारीला जरी परवानगी दिली तरी वारी ज्या गावातून जाणार आहे त्या गावात वारकर्‍यांचे दर्शन घेण्यासाठी लोकांचे लोंढे येतील. गावा-गावात कोरोनाचा प्रसार होईल. याबाबत मी बंडातात्यांशी चर्चा करून पायी वारीचा आग्रह धरू नका, अशी विनंती केली आहे. आजही मी पुन्हा विनंती करतो की, पायी वारीऐवजी यावर्षीही बसमधून माऊलींची वारी न्यावी. यावर्षी एक बस जादा देण्याचा विचार केला आहे.


Back to top button
Don`t copy text!