दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२३ । सातारा । महाराष्ट्र राज्याचे पहिले गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर-मरळी येथे आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दौलतनगर-मरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून चित्ररथ गौरव यात्रेस प्रारंभ झाला. या गौरव यात्रेत शासनाच्या 26 विभागांकडील सुमारे 150 योजना व विकासकामांची माहिती देणारे चित्ररथ सहभागी झाले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याचे पहिले गृहमंत्री म्हणून लोकनेते बाळासोहब देसाई यांनी केलेल्या कार्याचे व त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथांचाही समावेश आहे.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत गौरव यात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी विजयादेवी देसाई, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई, यांच्यासह प्रांताधिकारी सुनील गाडे, संबंधित विविध विभागांचे अधिकारी, तसेच लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मरळी दौलतनगर येथून सुरु झालेली ही गौरव यात्रा तालुक्यातील विविध गावातून मार्गस्थ होत पाटण येथे याचा समारोप करण्यात आला.
या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर, शासकीय योजनांची माहिती देणारे प्रदर्शन, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, तसेच विविध प्रवचने व किर्तन, भजन, जागर यांचेही आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य शिबीरामध्ये उपस्थितांची सर्व प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.