स्थैर्य, मुंबई, दि. २७: पुजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात भाजपकडून शिवसेनेवर टीकास्त्र सुरूच आहे. यात सर्वात पुढे भाजप नेत्या चित्रा वाघ आहेत. त्या मागील अनेक दिवसांपासून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. परंतु, आता एका मॉर्फ केलेल्या व्हायरल फोटोमुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये चित्रा वाघ आणि संजय राठोड जवळ उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे. या प्रकरणात आता चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी या फोटोंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे.
याबाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘महाराष्ट्रात अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणे गुन्हा झालाय का ? जे काम पोलिसांचे आहे, ते पोलिसांनी केले असते, जे काम सरकारचे आहे, ते काम सरकारने केले असते, तर आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची गरज नसती पडली. स्वतः काही करायचे नाही आणि अशा पद्धतीने फौज उभी करायची. हे जे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल केले जात आहेत, नेमके तुम्ही काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात ?’ असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.