सातार्‍यात 31 जानेवारीपासून बालनाट्य स्पर्धेचे आयोजन


स्थैर्य, 17 जानेवारी, सातारा : बालकलाकारांना रंगभूमीवर त्यांच्यामधील अंगभूत कलागुणांना वाव मिळावा, यासाठी सातारा पालिका आणि कल्याणी ग्रुप यांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र स्तरावरील नटखट करंडक बालनाट्य स्पर्धेचे यंदाही आयोजन करण्यात आले आहे. यंदा स्पर्धेचे आठवे पर्व असून, 31 जानेवारीपासून एक फेब्रुवारीपर्यंत येथील श्री शाहू कलामंदिर येथे स्पर्धा होईल, अशी माहिती कल्याणी ग्रुपचे प्रमुख माजी नगरसेवक कल्याण राक्षे यांनी दिली.

या स्पर्धेत सातार्‍यासह पुणे, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सांगली आदी भागातील निवडक 19 संघांना निमंत्रित केले आहे. या संघातील बालकलाकार विविध नाटकांमधून त्यांचे कौशल्य सादर करतील.
31 जानेवारीला सकाळी दहा वाजता स्पर्धेस प्रारंभ होईल. यादिवशी दहा संघ त्यांची कला सादर करतील. रविवारी एक फेब्रुवारीला नऊ संघाचे सादरीकरण असेल, असेही राक्षे यांनी नमूद केले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांचीनिवास व्यवस्था मोफत केली जाते. याबरोबरच नाट्य सादरीकरणासाठी लागणारे साहित्य, विद्युत व्यवस्था, संगीत व्यवस्था हे सर्व संयोजन समिती पूर्णतः मोफत देणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघांच्या पारितोषिकासह प्रत्येक कलाकाराला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

जिल्ह्यातील नाट्य रसिकांनी स्पर्धा पाहण्यास आवर्जून उपस्थिती लावावी, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सर्व नाट्य रसिकांना मोफत प्रवेश दिला जातो, अशी माहिती कल्याण राक्षे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!