दैनिक स्थैर्य । दि. २६ जून २०२३ । फलटण ।
ग्रामीण भागातील मुलांना संधी मिळाल्यास ते उज्वल यश संपादन करु शकतात, किंबहुना आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपले कौशल्य श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करु शकतात हे फलटण तालुक्यातील ३ विद्यार्थीनी हॉकी खेळाडू यांनी सिध्द करुन दाखविल्याचे निदर्शनास आणून देत, देशी खेळांची उज्वल परंपरा भारत देशाला लाभली असून त्यामध्ये हॉकीचा समावेश असल्याचे नमूद करीत ऑलम्पिकमध्ये सर्वाधिक पदके भारताने जिंकली असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
अशियाई महिला हॉकी स्पर्धेत उत्तम कामगिरी आणि सिनिअर संघात समावेश झाल्याबद्दल येथील बस स्थानक परीसरात आयोजित कु. वैष्णवी फाळके यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी शुभेच्छा देताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे संचालक महेंद्र सुर्यवंशी बेडके, राजन फराटे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, भाजपचे तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, तालुका क्रिडाधिकारी महेश खुटाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमंत संजीवराजे म्हणाले, ग्रामीण भागातील मुलांना संधी मिळाल्यास त्या संधीवर स्वार कसे व्हावे हे कु. वैष्णवी फाळके आणि कु. ऋतुजा पिसाळ यांनी दाखवून देत तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थीनी समोर एक अदर्श ठेवला आहे. यातून प्रेरणा घेऊन फलटण तालुक्यातून अनेक आदर्श खेळाडू निर्माण व्हावेत.
फलटण तालुक्यात विविध खेळांच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडले आहेत, त्यापैकी अनेक राष्ट्रीय पातळीवर गेले आहेत, मात्र या दोन्ही मुलींनी अंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होऊन तालुक्याची उंची वाढवत या तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राची परंपरा कायम राखली आहे, किंबहुना ती अधिक उंचावली असल्याचे सांगताना देशी खेळांची उज्वल परंपरा भारत देशाला लाभली असून त्यामध्ये हॉकीचा समावेश असून ऑलीम्पिकमध्ये सर्वाधिक पदके भारताने जिंकली असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
गुणवत्ता सिद्ध केलेल्या खेळाडू किंवा अन्य क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार केल्यामुळे या खेळाडूंना प्रोत्साहन मिळते आणि त्यांची प्रेरणा घेऊन नवीन मुले गुणी खेळाडू म्हणून तयार होतील याची ग्वाही देत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करित आपल्या मुली देशासाठी खेळाडू तयार करण्याचे कार्य करत आहेत याची जाणीव ठेवून मुलींना सर्वतोपरी मदत, सहकार्य, मार्गदर्शन करणाऱ्या फाळके आणि पिसाळ यांच्या आई – वडीलांचेही अभिनंदन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत, मान्यवरांचे सत्कार झाल्यानंतर प्रकाश सकुंडे गुरुजी यांनी प्रास्ताविकात कु. फाळके ही तिच्यातील हॉकी खेळातील प्राविण्यामुळे इयत्ता ३ री पासून बालेवाडी पुणे येथील क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेत असून तिने आपले कौशल्य मेहनतीतून विकसीत केल्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर लीलया खेळून आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणणारी गुणवंत खेळाडू बनल्याचे स्पष्ट केले. तर अभार सुरेंद्र फाळके यांनी मानले.
यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य विश्वासदादा गावडे, सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष प्रमोद झांबरे, सरपंच महादेव सकुंडे, सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक डॉ. हणमंत फाळके, राजन फराटे, विशालसिह माने पाटील, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक स्वामी साबळे व महादेव माने, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव माने पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन राहुल ढवळे, हरिश्चंद्र पवार आणि आसू व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रारंभी गावातील प्रमुख मार्गावरुन कु. वैष्णवी फाळके यांची मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता.