
स्थैर्य, फलटण, दि. १५ सप्टेंबर : फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या बदलीच्या वृत्ताचे, नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अनुप शहा यांनी स्वागत केले आहे. या बदलीबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे आभार मानत, या निर्णयाचा आनंद साजरा करण्यासाठी उद्या, मंगळवारी नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर जल्लोष करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
एका व्हिडिओद्वारे माहिती देताना अनुप शहा म्हणाले, “फलटणचे मुख्याधिकारी यांची बदली झाली असून, नवीन मुख्याधिकारी रुजू होत आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मागे ठाम भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.”
या बदलीच्या आनंदप्रीत्यर्थ उद्या, मंगळवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता, फलटण नगरपरिषदेच्या दारात फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला जाणार असल्याचेही अनुप शहा यांनी सांगितले. “फलटणकरांची सुटका केल्याबद्दल आम्ही त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आता शहराला पारदर्शक कारभार देणारे मुख्याधिकारी मिळतील,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.