दैनिक स्थैर्य । दि. २७ मार्च २०२३ । मुंबई । मांग गारुडी समाजाच्या मागण्या आणि अडीअडचणींसंदर्भात संघटनांसोबत बैठक घ्यावी. त्याचा अहवाल तयार करुन शासनास सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात मांग गारुडी समाजाच्या विविध मागण्यांबाबत बैठक झाली. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉ.सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, मांग गारुडी समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले.
मांग गारुडी समाज शिक्षण, रोजगार आदी सोयीसुविधांपासून वंचित राहू नये यासाठी त्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा. मांग गारुडी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र अधिक सुलभतेने देण्यासाठी दक्षता पथकाचा उपयोग करावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.