दैनिक स्थैर्य | दि. १६ जुलै २०२४ | फलटण |
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक विवाहित महिलेला १५०० रुपये महिना मिळणार आहेत. या योजनेचा शुभारंभ नुकताच मलटण (ता. फलटण) येथे संपन्न झाला. यावेळी मलटणमधील सुमारे ७०० महिलांनी नावनोंदणी करण्यासाठी गर्दी केली होती. या योजनेस मोठा प्रतिसाद मलटणमध्ये मिळत असल्याची माहिती फलटणचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांनी दिली आहे. नावनोंदणी शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती होती.
यावेळी पांडुरंग गुंजवटे यांनी सांगितले की, या योजनेत सहभागी होणार्या प्रत्येक महिलेला १५०० रुपये महिना मिळणार असून या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत वाढविली आहे.
या योजनेसाठी महिलांनी रेशनकार्ड, आधारकार्ड, जन्मतारखेचा दाखला, बँक पासबुक, फोटो घेऊन फलटणमधील शंकर मार्केट येथील मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर, बाजारे शाळेच्या प्रांगणात संपर्क करावा, असे गुंजवटे यांनी सांगितले.