स्थैर्य, मुंबई, दि. १५ : महान शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे अभिवादन केले. डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाच्या मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. वाचनातून जीवनाला योग्य दिशा देण्याची प्रेरणा मिळते. म्हणून पुस्तकांवर प्रेम करा, असा संदेश डॉ. कलाम यांनी आपल्या कृतीतून दिला आहे. हा संदेश नव्या पिढीसाठी खूप मोलाचा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच संरक्षण क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी डॉ. कलाम यांनी दिलेले योगदान अमूल्य असे आहे. त्यांनी या क्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पीत केले. डॉ. कलाम यांचे व्यक्तिमत्त्व मुर्तीमंत प्रेरणादायी असेच होते. त्यांच्या प्रत्येक कृतीत राष्ट्राच्या विकासाचा विचार होता. त्यांनी आयुष्यभर पुस्तकांवर मोठे प्रेम केले. कसदार आणि दर्जेदार वाचनातून जीवनाला योग्य दिशा देण्याची प्रेरणा मिळते, म्हणून पुस्तकांवर प्रेम करा. त्यांच्याशी मैत्री करा, असे ते सांगत. हा संदेश नव्या पिढीसाठी खूप मोलाचा आहे. तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यावर त्यांचा भर होता. देशातील तरुणांसमोर त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श उभा केला. महान शास्त्रज्ञ भारत सुपूत्र डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
महान शास्त्रज्ञ डॉ. कलाम यांच्या जयंतीच्या या वाचन प्रेरणा दिनी आज पासून राज्यातील विज्ञान व तंत्रज्ञानाशी निगडीत संशोधन संस्थांतील प्रयोगशाळा आणि सर्व प्रकारची ग्रंथालये खुली केली आहेत. ‘मिशन-बिगीन-अगेन’ मधून ही पर्वणी पुन्हा पुस्तकप्रेमी आणि संशोधकांसाठी खुली झाली आहे. या ठिकाणी कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठीच्या आरोग्य दक्षतेच्या नियमांचे पालन करूनच या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.