स्थैर्य, मुंबई, दि.१३: राज्यातील मंदिरे सुरू करण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हिंदुत्वाची आठवण करुन दिली. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनीही चांगलेच प्रत्युत्तर दिले. यावर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यांचा आत्मा आणि मन हिंदुत्वाने ओतप्रोत भरलेले आहे. त्यांना हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही. ठाकरे सरकार लोकनियुक्त आहे आणि राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे सरकार घटनेनुसार चालत आहे की नाही तेवढंच पाहा’, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. तसेच, ‘देशात काही राज्यांनी मंदिरे उघडली, तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला’, असेही राऊत म्हणाले.