
स्थैर्य, मुंबई, दि. १३: बीड जिल्ह्यातील परळीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने पुण्यामध्ये आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. यामध्ये सुरुवातीला महाविकास आघाडीतील कथित मंत्र्याचे नाव घेतले जात होते. मात्र आता चित्रा वाघ यांनी थेट वनमत्री संजय राठोड यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी पूजाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील अशीच चर्चा पाहायला मिळते आहे. सोशल मीडियावर पूजा विशेष लोकप्रिय होती, परिणामी या घटनेचे पडसाद सोशल मीडियावर देखील उमटत आहेत.
सूत्रांची अशी माहिती मिळते आहे की, याप्रकरणात वन मंत्री संजय राठोड यांच्यावर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. शुक्रवारी वर्षा निवास्थानी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली आहे. तर सदर प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
एका तरुणीमुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीच्या आत्महत्येनंतर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर देखील एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर पुण्यात राहणाऱ्या या परळीतील तरुणीने आत्महत्या केल्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील मंत्र्याकडे बोट दाखवण्यात येत आहे. याप्रकरणी काही ऑडिओ क्लिप देखील व्हायरल होत आहेत. मीडिया अहवालांनुसार व्हायरल होणारं फोनवरील संभाषण एक कार्यकर्ता आणि कथित मंत्री यांच्यामधील आहे.
भाजपने हा मुद्दा उचलून धरल्याने त्याकडे सरकार गांभीर्याने लक्ष देण्याची शक्यता आहे शिवाय पुजाच्या कुटुंबीयांकडून देखील तिला न्याय मिळावा अशी मागण होत आहे. भाजपच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचं नाव घेत उद्धव ठाकरेनां लक्ष्य केलं आहे. संजय राठोड यांचं नाव घेत त्यांनी पूजाला आत्महत्येस प्रवृत्त केलं असा आरोप त्यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील हा मुद्दा उचलून धरला आहे. पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणात 12 ऑडिओ क्लिप्स हाती लागल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. याप्रकरण त्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून त्या ऑडिओ क्लिप्सची प्रत त्यात जोडल्याचे म्हटले आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये कुणाचा आवाज आहे, त्यातून पूजाने आत्महत्या केली की तसे करण्यात तिला प्रवृत्त केले गेले असे अनेक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत.