“निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या मारहाण प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तमाम जवानांची व महाराष्ट्राची माफी मागावी- आ. अतुल भातखळकर”

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि. १२ : निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखाविरोधात कारवाई करण्याचे नाटक ठाकरे सरकार कडून करण्यात आले होते. या विरोधात आ. अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात व विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मारहाण प्रकरणातील सर्व आरोपींच्या विरोधात घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी कलम ४५२ हे अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन अप्पर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहे.

काल कांदिवली येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर उद्धव ठाकरे यांचे कार्टून फॉरवर्ड केल्यामुळे त्यांच्या घरात घुसून शिवसेनेचा शाखाध्यक्ष कमलेश कदम व त्याच्या ८-१० साथीदारांनी जबर मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सोडून पोलीस मदन शर्मा यांनाच अटक करण्यास गेली होती.  या विरोधात कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर यांनी मारहाण केलेल्या आरोपींना अटक करण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परंतु राज्याला गुंडागर्दीचे राज्य बनवू पाहणाऱ्या ठाकरे सरकारच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी जामीनपात्र कलम लावून केवळ कारवाई करीत असल्याचे नाटक केले. काल रात्रीच सर्व आरोपींना पोलीस स्थानकातूनच जामीन मंजूर करून सोडून देण्यात आले. मारहाण झालेले मदन शर्मा हे इस्पितळात आहेत व आरोपी मोकाट सुटले आहे. स्वतःच्या जीवाची काळजी न करता देशसेवा करणाऱ्या निवृत्त सैनिकाला शिवसेनेच्या गुंडाकडून ज्या प्रकारे मारहाण करण्यात आली आहे हि बाब शरमेने मान खाली घालणारी असून शिवसेनेने व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तमाम जवानांची व महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी सुद्धा आ. भातखळकर यांनी केली आहे.

एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला घरात घुसून शिवसैनिकांकडून एवढी जबर मारहाण केली जात असताना सुद्धा राज्याचे ठाकरे सरकार झोपेचे सोंग घेत असून, महाराष्ट्राला शिवसेनेच्या गुंडाचे राज्य बनविण्याचे काम केले जात आहे, सरकारच्या विरोधात जे बोलतील त्यांना मारहाण केली जात आहे, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांच्या विरोधात सुडाचे राजकारण करण्याचे काम ठाकरे सरकारकडून केले जात आहे, सत्ता त्यांच्या डोक्यात गेली असून त्यांचा माज महाराष्ट्राची जनता उतरविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास असल्याचे आ. भातखळकर म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!