
दैनिक स्थैर्य । दि. 30 मे 2025 । फलटण । ‘‘दिल्ली पासून फलटण पर्यंतची सत्ता ज्या पक्षाकडे आहे, ज्यांचे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांशी जवळचे संबंध आहेत; अशा पक्षाच्या नेत्यांना नगरपालिका प्रशासनावर अंकुश ठेवण्यात यश येत नाही. कारभार सुधरवण्याऐवजी त्यांच्याच कार्यकर्त्यांना नगरपालिकेत जावून आंदोलन करावे लागत आहे; ही देखील फलटणकरांच्यादृष्टीने मोठी शोकांतिका आहे’’, अशी खोचक टिकाही प्रितसिंह खानविलकर यांनी प्रसिद्धीपत्रकात केली आहे.
फलटण नगरपरिषदेत भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींकडून मुख्याधिकारी निखील मोरे यांच्या कारभाराविरोधात आज संताप व्यक्त करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रितसिंह खानविलकर यांनी सदरचे प्रसिद्धीपत्रक दिले आहे.
प्रितसिंह खानविलकर यांनी नमूद केले आहे की, ‘‘आत्ताच्या अतिवृष्टीत माणसांच्या गोडाऊनमध्ये पाणी शिरले असताना मदतीसाठी केलेला फोनही मुख्याधिकार्यांनी उचलला नाही. त्यांना यासंबंधी व्हॉटस्अॅपवर पाठवलेले मेसेजही त्यांनी पाहिले नाहीत. त्यांच्या प्रशासकीय राजवटीत फलटणची घडी पूर्णत: विस्कटलेली आहे. ठराविक काँन्ट्रॅक्टर वर्गाला पाठीशी घालणार्या या ‘उद्योगी’ आणि ‘अतिहुशार’ अधिकार्याची शहरातून तातडीने हकालपट्टी होणे गरजेचे आहे.’’
‘‘आपद्कालीन परिस्थिती असताना तरी निदान फलटणच्या मुख्याधिकार्यांनी शासकीय निवासस्थानात थांबायला हवे होते. विद्यमान मुख्याधिकारी हे फलटण नगरपालिकेला लागलेले ग्रहण असून ते दूर करण्यासाठी सर्व पक्षीय ‘मुख्याधिकारी हटाव; फलटण बचाव’ आंदोलन करावे लागेल’’, असे विधान राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.