उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा विसर पडल्याचे दिसले – भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ मे २०२२ । मुंबई । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी मुंबईतील सभेत भाषण करताना राज्याच्या विकासाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचे विसरले. स्वतः पेट्रोल डिझेलची महागाई कमी करण्याची जबाबदारी विसरले. दाऊदच्या टोळीशी व्यवहार करणाऱ्याला आपण मंत्रिमंडळात ठेवले आहे, हे सुद्धा विसरले. त्यांना मुख्यमंत्रीपदाचाच विसर पडल्याचे दिसले, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, भाजपा दाऊदला मंत्री करेल, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी मारला. पण ते हे विसरून गेले की, दाऊद इब्राहिमच्या टोळीला आर्थिक मदत होईल अशा रितीने त्याच्या साथीदारांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेला एक मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. या नेत्याला तुरुंगात जावे लागले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला मंत्रिमंडळात कायम ठेवले आहे.

त्यांनी सांगितले की, महागाईबद्दल का बोलत नाही, असा सवाल मा. उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला. राज्यातील पेट्रोल डिझेलवरील कर कमी करा म्हणून पंतप्रधानांनी सांगितल्याचाही त्यांना राग आला. पण उद्धव ठाकरे विसरले की, पेट्रोल डिझेलवरील व्हॅटच्या दरात कपात करून त्यांचे सरकार महाराष्ट्रातील जनतेला महागाईपासून मोठा दिलासा देऊ शकते. असा दिलासा गुजरात आणि इतर राज्यांनी दिला आहे. स्वतः महागाई कमी करण्यासाठीची जबाबदारी विसरून दुसऱ्याला सवाल विचारणे म्हणजे मुख्यमंत्री असल्याचा विसर पडल्याचे लक्षण आहे.

ते म्हणाले की, आपल्या सरकारमुळे मराठा समाजाचे असलेले आरक्षण गेले व ते पुन्हा मिळविण्यासाठी सरकार काहीच करत नाही, ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले, राज्यात पुन्हा लोडशेडिंग सुरू झाले, शेतकऱ्यांची वीज कनेक्शन मोठ्या प्रमाणात कापली, हजारो एकरांवर अजूनही ऊस तसाच उभा आहे आणि ऊसाचे गाळप होत नाही म्हणून शेतकऱ्याने आत्महत्या केली. अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल त्यांनी उल्लेखही केला नाही. विकासकामे म्हणून मुंबई महापालिकेने केलेले शाळांचे काम सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आपण मुख्यमंत्री असल्याचा विसर पडलेला दिसला.


Back to top button
Don`t copy text!