दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑगस्ट २०२२ । खंडाळा । खंडाळा तालुक्यातील पुणे-सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या या सारोळा पुलावर सातारा जिल्ह्याच्यावतीने जेसीबीच्या साहाय्याने गुलाबाची पुष्पवृष्टी करीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे व मंत्री शंभूराजे देसाई यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या स्वगृही येत असून सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने व भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यानुसार सातारा-पुणे जिल्ह्याच्या सिमेवर मोठ्या प्रमाणात पदाधिका-यासहित अधिकारी, पोलीस प्रशासन यांनी हजेरी लावली होती. सुरवातीला माजी गृहराज्यमंत्री व आत्ता कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेले शंभूराजे देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत सातारा जिल्ह्याच्यावतीने करण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या सीमेवर व शिरवळ येथील शासकीय विश्रामगृह याठिकणी आले होते. यावेळी शिवसेना (शिंदे गट) व भाजपच्या कार्यकर्त्यानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान, सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व मंत्री शंभूराजे देसाई यांचे सातारा जिल्हयाच्या सीमेवर आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत व क्रेनद्वारे गुलाबाच्या फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व मंत्री शंभूराजे शिंदे यांचे सातारा जिल्ह्याच्यावतीने सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सातारा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्वागत केले. याप्रसंगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, वाई, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, खंडाळा तहसीलदार दशरथ काळे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, खंडाळा पंचायत समिती माजी सदस्य चंद्रकांत यादव, माजी उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने, भाजप ओबीसी मोर्चा राज्य सरचिटणीस अनुप सूर्यवंशी, खंडाळा भाजप तालुकाध्यक्ष अनिरुद्ध गाढवे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, माजी उपसभापती सारिका माने, माजी सभापती गुरुदेव बरदाडे, पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, शिरवळ सरपंच लक्ष्मी पानसरे आदी उपस्थित होते. यावेळी शिरवळ याठिकाणी भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यावतीने महामार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री शंभूराजे शिंदे यांचे गुलाबाच्या पुष्पवृष्टीमध्ये स्वागत करण्यात आले तर खंडाळा याठिकाणी भाजपच्यावतीने फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले.
छायाचित्र- पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमेवर गुलाबाच्या पुष्पवृष्टीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री शंभूराजे शिंदे यांचे स्वागत करण्यात आले.