स्थैर्य, सातारा, दि. 07 : कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून सातारा शहरातील छत्रपती शाहू जिल्हा क्रिडा संकुल बंद ठेवण्यात आले होते. टप्या टप्याने लॉकडाऊनचे नियम शिथील झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर प्राथमिक टप्प्यात केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे क्रीडा संकुलातील मैदानांवर समुह विरहित, सामाजिक अंतर राखून शारीरिक व्यायाम व इतर खेळ खेळण्यास परवानगी दिली आहे. याबाबत जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सचिव जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सकाळी सहा ते नऊ आणि दुपारी चार ते सायंकाळी सहापर्यंत खुले राहील. प्राथमिक टप्प्यात नागरिकांसाठी मुख्य मैदान, बास्केटबॉल मैदान, लॉन टेनिस हे सुरू राहील. क्रीडा संकुलातील व्यायामशाळा (जिम), जलतरण तलाव, बॉक्सिंग, योगा हॉल, बॅडमिटन हॉल व अन्य सर्व अंतर्गत हॉल व्यायामासाठी तूर्तास बंद राहतील. खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी क्रीडा संकूलाच्या प्रवेशदारानजीक सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाडू, नागरिकांनी क्रीडा विषयक व्यायाम करताना जर गर्दी अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास ते तात्काळ बंद करण्यात येईल.
दरम्यान, क्रीडा संकुलनात कोणत्याही प्रकारचा सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे व मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम करता येणार नाहीत. तसेच 65 वर्षावरील व्यक्ती, व्याधीयुक्त व्यक्ती, गर्भवती महिला, दहा वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळता घरामध्येच राहवे. त्यांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध राहण्याचे आदेश असल्याने संबंधित नागरिकांनी सहकार्य करावे.
क्रीडा संकुलात सरावासाठी येणारे खेळाडू, सर्व नागरिकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू या ऍपचा वापर करावा. सार्वजानिक ठिकाणी चेहऱयाचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱया व्यक्तींवर पाचशे रूपयांचा दंड तसेच सार्वजानिक अथवा खाजगी जागेच्या ठिकाणी थुंकण्यास मनाई असून थुंकल्यास एक हजार रूपयांचा दंड आकारण्यात येतात. तरी खेळाडुंनी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे व कडक कारवाई टाळावी असे आवाहन नाईक यांनी केले आहे.