स्थैर्य, सोलापूर. दि. 23 : सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने शहरातील नागरिकांच्या व्यापक तपासणीसाठी सहा बसचे रुपांतर मोबाईल क्लिनिकमध्ये करण्यात आले आहे. मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागांमध्ये ज्येष्ठ नागरिक तसेच कंटेनमेंट झोनमधील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.
सोलापूर महानगरपालिकेकडे परिवहन विभागाच्यावतीने आरोग्य तपासणीसाठी मोबाईल क्लिनिकची उभारणी करण्यात आली होती. मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात तपासणीसाठी वाढती मागणी पाहता परिवहन विभागाकडून अजून सहा बस आरोग्य तपासणी व रॅपिड अँटीजन टेस्टसाठी तयार करण्यात आल्या आहेत. त्या बसची पाहणी आज महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केली. त्यांनी सांगितले, सोलापूर शहरातील कंटेन्मेंट, नॉन कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची तपासणी या मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून केली जाईल. महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या रॅपिड अँटिजेन टेस्ट सुध्दा या क्लिनिकमध्ये होणार आहे.
आज पाहणीच्यावेळी सभागृह नेते श्रीनिवास करली, परिवहन सभापती जय साळुंखे, परिवहन सदस्य अशोक अण्णा यानगंटी, बाळासाहेब आळसांदे, गणेश जाधव, परिवहन व्यवस्थापक लिगाडे उपस्थित होते.