स्थैर्य, मुंबई, दि.२३: वैद्यकीय क्षेत्रातील
प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबर रोजी जाहीर
करण्यात आला. त्यामध्ये, ओडिशाचा शोएब अफताब आणि दिल्लीच्या आकांक्षा सिह
यांनी 720 गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक मिळवा. मात्र, या परीक्षेत
अमरावती येथील विद्यार्थिनी वसुंधरा भोजने हिला शून्य गुण मिळाले आहेत.
आपल्या निकाल पाहून तिने आश्चर्य व्यक्त केले असून सोमवारी उच्च न्यायालयात
धाव घेतली. याप्रकरणी न्या. ए. एस. चांदुरकर व न्या. एन. बी. सूर्यवंशी
यांनी नीट परीक्षा आयोजक एनटीएला नोटीस जारी केली असून यासंदर्भात 26
ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
देशात 13 सप्टेंबर व 14 ऑक्टोबर रोजी
परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल घोषित झाला. त्यावेळी अमरावतीच्या
वसुंधरा भोजने हिला 720 गुणांपैकी शून्य गुण मिळाल्याचे दिसून आले.
वसुंधरासाठी हा निकाल धक्कादायक होता, कारण तिने गेल्या वर्षभरापासून नीट
परीक्षेची तयारी केली होती. तसेच, कुशाग्र बुद्धमत्ता असलेल्या वसुंधरा
हिचा हा निकाल पाहून आई-वडिलांसह शिक्षकांनाही विश्वास बसेना. त्यामुळे,
याप्रकरणी वसुंधराने एनटीएकडे रितसर निवेदन देत संपूर्ण वस्तुस्थिती कथन
केली. पण, अद्याप कोणतेही उत्तर अथवा पत्रव्यवहार या एजन्सीमार्फत करण्यात
आलेला नाही.
वसुंधरा भोजने ही हुशार विद्यार्थिनी असून
तिला दहावीच्या परीक्षेत 93 टक्के तर बारावीत 81.85 टक्के गुण मिळाले
आहेत. त्यामुळे त्यांचा डॉक्टर होण्याचा मानस असल्याने नीट परीक्षा दिली व
या परीक्षेत त्यांना 600 गुण मिळण्याची अपेक्षा होती. निकालामध्ये काही
तांत्रिक घोळ निर्माण झाल्याने कदाचित शून्य गुणांची नोंद झाली असावी. या
परीक्षेत पुनर्मूल्यांकन आणि पुन्हा पेपर तपासणीची तरतूद नसल्याने ओएमआर
शीटच्या आधारे दिलासा मिळणे शक्य होते व त्यासंदर्भात एटीएला निवेदन दिले
आहे. पण, त्यावर अजूनही उत्तर न आल्याने त्यांनी उच्च न्यायालयाकडे धाव
घेतली. न्यायालयाने व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी करीत
एनटीएला नोटीस जारी केली असून 26 ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्यास
सांगितले आहे.