स्थैर्य, कऱ्हाड (जि. सातारा), दि.५ : जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना कोणी फसवेना तो आळशी, अशी गत असतानाच शेतात टॉवर बसवण्यासाठी संपर्क करा, अशा सोशल मीडियावरील जाहिरातींना फसून अनेक शेतकरी लाखो रुपयांना गंडत असल्याचे पोलिस ठाण्यात त्यासंदर्भात दाखल होणाऱ्या तक्रारींतून समोर आले आहे. कमी जागेत दर महिन्याला अधिक उत्पन्न मिळेल, या आशेने अनेक शेतकरी गंडले असून, त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
नैसर्गिक अडचणींवर मात करून शेतकरी हिमतीने त्यांच्या शेतातून उत्पादन घेतात. ते घेताना त्यांना नैसर्गिक आपत्तीना तोंड द्यावे लागते. त्यातूनही चांगले उत्पादन मिळेलच याची खात्री नसते. चांगले उत्पादन आले तर चांगला दर मिळेलच याची खात्री नसते. त्यामुळे शेतकरी हा त्याच्या हिमतीवर मोठ्या उलाढाली करत असतो. त्यातच त्याला अनेकजण फसवतही असतात. कुणी वजन काट्यात, कुणी दरात, कुणी खरेदी दरात व अन्य व्यवहारात त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन फसवल्याचे यापूर्वीही सिद्ध झाले आहे. त्यातच सध्या सोशल मीडियावरूनही त्यांची फसवणूक होत आहे. तुमच्या शेतात मोबाईल टॉवर बसवा आणि लाखो रुपये कमवा, अशा जाहिराती सोशल मीडियावर केल्या जात आहेत. कमी जागेत दर महिन्याला उत्पन्न सुरू होईल, या भाबड्या आशेवर शेतकरीही त्याला फसत आहेत. संबंधित जाहिरातीत मोबाईल नंबर असतो. त्या मोबाईलला शेतकरी फोन करतात. त्यांना पहिल्यांदा त्यांच्या जमिनीचा सातबारा, खाते उतारा, आधारकार्ड, पॅनकार्ड मागवून घेतात. त्यानंतर त्यांना कागदपत्रे योग्य असल्याचे सांगतात. त्यानंतर शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशनसाठी 30 किंवा 60 हजार रुपये त्यांच्या खात्यावर भरा, असे सांगतात.
शेतकऱ्यांनी ते पैसे भरल्यावर त्यांना 30 ते 60 लाख रुपये तुमच्या खात्यावर भरतो, बॅंक खात्याचे डिटेल्स पाठवा, असे सांगतात. ते पाठवल्यावर त्या पैशांची जीएसटी भरावी लागणार आहे. त्यासाठी 50 ते 80 हजार रुपये भरा, असे सांगतात. ते भरल्यावर टॉवरचे साहित्य ट्रकात भरले आहे, ट्रकचा टोल व अन्य कामासाठी आणखी 10 ते 20 हजार भरा, असे सांगतात. ते भरल्यावर साहित्य भरल्याचा ट्रक चार ते पाच दिवस पोचला नाही म्हटल्यावर ते संबंधिताला फोन करतात. त्यावेळी संबंधिताचा फोन बंद लागतो. त्यानंतर शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजते. त्यानंतर ते पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देतात. अशा प्रकारे अनेक शेतकऱ्यांना टॉवर देतो, असे सांगून गंडवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
मी जाहिरात बघून शेतात टॉवर बसवण्यासाठी संबंधित मोबाईल क्रमांकाला फोन केला. त्यांनी कागदपत्रे मागितली. ती दिल्यावर त्यांनी 30 हजार रुपये रजिस्ट्रेशनसाठी मागितले. त्यानंतर त्यांनी तीन दिवसांत खात्यावर 90 लाख भरतो, त्याच्या जीएसटीसाठी 60 हजार भरा, असे सांगितले. ते भरल्यावर दोन दिवसांत साहित्य येईल. ट्रकचे भाडे आणि टोलसाठी 10 हजार भरा, असे सांगितले. असे करत मला दोन लाखाला फसवले आहे. अन्य शेतकऱ्यांनी असे फसू नये.
-एक शेतकरी
कोणत्याही टॉवर कंपन्या सोशल मीडियावर जाहिराती करून टॉवर उभे करत नाहीत. त्यासाठी अगोदर ते सर्व्हे करतात. त्यानंतर ते पुढील कार्यवाहीसाठी थेट शेतकऱ्यांकडे येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा जाहिरातींना फसून स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेऊ नये.
– धीरज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक