स्थैर्य, सातारा, दि.२: साताऱ्यातील एका महिलेला तिचा पती व इतर दोन नातेवाईकांनी तू आमच्या स्टेटसची नाही” असे म्हणून तिचा जाचहाट केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी मान्या यानिक उपासणी (रा.कांदीवली, मुंबई. सध्या रा.सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती यानिक पंकज उपासणी, नलिनी पंकज उपासणी, पंकज शंभुनाथ उपासणी (सर्व रा. कांदीवली, मुंबई) यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचा यानिक याच्यासोबत विवाह झाल्यापासून त्या त्यांच्यासोबत कांदीवली येथे राहण्यासा होत्या. संशयितांनी तक्रारदार यांच्याकडे व्यवसाय करण्यासाठी पाच लाख रूपयांची मागणी केली होती. त्यापैकी दोन लाख रुपये तक्रारदार यांनी माहेरवरून आणून दिले होते. तरीही संशयित त्यांना त्रास देत होते. तसेच पती यानिक याने तू माझ्या स्टेटसची नाहीस,वडीलांनी पसंत केले म्हणून विवाह केला”,असे म्हणून त्यांना अपमानित करून तक्रारदार यांना घर सोडण्यास भाग पाडले. घर सोडताना संशयितांनी किरकोळ कारणावरून तक्रारदार यांना मारहाण करण्यास सुरूवात केली तर पतीने त्यांच्या हातावर दगड मारून त्यांना जखमी केले. तसेच घर सोडताना त्यांना दागिने अथवा कपडे यापैकी काहीच दिले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार माने हे करत आहेत.