चंद्रपूर जिल्हा बँक घोटाळा, खातेदारांच्या खात्यातून रक्कम गायब झाल्याचे उघड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि.१६: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा घोटाळा समोर आला असता दिवसागणिक यात धक्कादायक खुलासे होत आहेत. आज या संदर्भात शेकडो खातेदारांनी बँकेच्या शाखेत धडक दिली असता त्यांच्या खात्यातून रक्कम गायब झाली असल्याचे समोर आले.

या संदर्भात सामनाच्या हाती एक पत्र लागले आहे. ज्यात हा घोटाळा चार महिन्यांपुर्वीच उजागर झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, बँकेचे प्रशासन आणि संचालक मंडळाने पांघरूण घालण्याचे काम केले. वेळेत रोखपाल याची चौकशी केली असती तर हा घोटाळा झालाच नसता. पण असे न केल्याने बँकेचे संचालक मंडळ आणि प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बँकेशी संबंधित काही बडे लोक घोटाळ्याला खतपाणी घालण्याचे काम करत होते हे यातून स्पष्ट होत आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास होणे गरजेचे आहे.

जनता शासकीय-निमशासकीय संस्थेने जिल्हा परिषदेच्या समोर असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेतील रक्कम गहाळ झाली असल्याची तक्रार केली असता ह्या घोटाळ्याचे बिंग फुटले. रोखपाल निखिल घाटे याने अशा अनेक संस्थांचे पैसे लाटून जवळपास दीड कोटींचा अपहार केल्याचे निदर्शनास आले होते. मात्र हे हा घोटाळा जवळपास दहा कोटींचा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज बँके उघडली असता बँकेच्या खातेदारांची येथे अक्षरशः झुंबड उडाली. अनेकांच्या खात्यातून रक्कम लंपास झाली असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये पोलिसांना देखील सोडले नाही. जिल्हा पोलिस सहकारी पतसंस्था यांचे 11 लाख तर चंद्रपूर महानगरपालिकेच्या खात्यातील 9 लाख रुपये गहाळ केल्याचेही निदर्शनास आले. गरीब शेतकऱ्यांच्या घामाने कामविलेल्या पैशांनाही सोडले नाही. कुणाच्या खात्यातून दोन लाख, कुणाच्या खात्यातुन पाच लाख रक्कम गहाळ आहे.

ज्यांनी आयुष्यभर पै न पै गोळा करून पैसे गोळा केले, अश्या लोकांसमोर जगावे की मरावे असा पेच निर्माण झाला आहे. एकटा रोखपाल हे करणे शक्य नाही. यात बँकेचे काही अधिकारी आणि सत्ताधारी संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. अन्यथा हा प्रकार कधीच बाहेर आला असता. जेव्हा हा घोटाळा समोर आला तेव्हा देखील संचालक मंडळाचे सदस्य सारवासारवच करण्याचे काम करीत होते. आपली पत वाचविण्यासाठी बँकेने रामनगर पोलीस ठाण्यात थातुरमातुर तक्रार दिली. मात्र, प्रसिद्धीमाध्यमामध्ये बातम्या प्रकाशित होताच अखेर यात भादवी कलम 409 चा म्हणजे गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात सध्या तपास सुरू आहे.

काय आहे पत्रात

 

 

रोखपाल निखिल घाटे याचा पैसे लंपास करण्याचा खेळ हा अनेक महिन्यांपूर्वीपासून सुरू होता. आणि त्यात काही संचालक आणि अधिकाऱ्यांचा हात होता. अन्यथा हे प्रकरण या आधीच उघडकीस आला आता. येथील सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांची संशयास्पद कार्यप्रणाली एका पत्राने उघडी पाडली आहे. हे पत्र सामनाच्या हाती लागले आहे.

25 सप्टेंबरला नरपाचंद भंडारी या विजग्राहकाने त्यांना आलेल्या 28 हजार 880 रूपये विजबिलाचा भरणा जिल्हा परिषदेच्या समोर असलेल्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत केला होता. ही रक्कम महावितरण विभागाकडे जमा करायची होती. मात्र ती झाली नाही यासंदर्भात महावितरणने भंडारी यांना वीजबिल जमा करण्याची माहिती दिली. मात्र त्यांनी आपण विजबिलाची पूर्ण रक्कम जमा केल्याचे सांगितले. हा घाटे नामक रोखपाल ही सुद्धा रक्कम लंपास करीत होता. ही बाब महावितरणने मध्यवर्ती बँकेच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तब्बल 14 दिवसांनी म्हणजे 9 सप्टेंबरला ही रक्कम रोखपाल घाटे याने जमा केली गेली. याबाबत महावितरणने 28 सप्टेंबरला बँकेचे मुख्य कार्यकारी अधीकारी व्ही. एम. पोटे यांना पत्र लिहून ही बाब निदर्शनास आणून दिली.

यात बँकेच्या एकूण कार्यप्रणालीवर देखील गंभीर ताशेरे ओढले. याच वेळी रोखपाल घाटे याची चौकशी होणे गरजेचे होते. मात्र, या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली. आणि रोखपालाला अभय देण्यात आला. रोखपाल निखिल घाटे हा दिवंगत संचालक अनिल खणके यांचा सख्खा भाचा आहे. खणके हे सध्याचे बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या गटाचे मानले जात होते. त्यामुळे घाटे याचा व्याप मोठा होता हे स्पष्ट आहे.

ज्या दिवशी म्हणजे 12 फेब्रुवारीला हा घोटाळा समोर आला त्या दिवशी देखील रोखपाल घाटे यांचे नातेवाईक 48 लाख रोख रक्कम घेऊन बँकेत जमा करण्यासाठी घेऊन आले. बँकेचा कार्यालयिन वेळ संपला असताना सायंकाळी 7 वाजता ही रोकड बँकेत जमा करून घेण्यात आली, अशी विश्वासनिय माहिती आहे. अध्यक्ष संतोष रावत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पोटे यांच्या संमतीने ही रक्कम जमा करण्यात आली.

जेव्हापासून हा घोटाळा समोर आला तेव्हापासून रोखपाल घाटे फरार आहे. घाटे भेटला तर अनेकांसाठी अडचणीचा विषय ठरू शकतो. या घोटाळ्यात सामील असलेल्या अनेक बड्या लोकांचा पर्दाफाश होऊ शकतो. या भितीनेच त्याला फरार करण्यास त्याच बड्या लोकांनी मदत केली. त्यामुळे पोलिसांनी या फरार रोखपालाला तत्काळ अटक करून त्याची चौकशी करणे आवश्यक झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!