
स्थैर्य, सातारा, दि. 8 : मार्च ते मे या तीन महिन्याच्या कालावधीत लॉकडाउनमुळे वाहतूकदारांचे फार मोठे नुकसान झाले आहे. कर्नाटक, गुजरात, ओरिसा, आंध्र प्रदेश या राज्यांनी वाहतूकदारांना दिलेल्या सवलती महाराष्ट्र सरकारनेही द्याव्यात, यासह अन्य मागण्यांचे निवेदन सातारा जिल्हा ट्रान्स्पोर्ट माल व प्रवासी वाहतूक संघटनेच्यावतीने आज सातारा जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
यावेळी माध्यमांशी बोलताना प्रकाश गवळी म्हणाले, की लॉकडाउनच्या काळात संपूर्ण देशात पर्यायाने महाराष्ट्रात बस प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेमुळे वाहने बंद करण्यात आल्यामुळे वाहतूकदार फार मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहेत. सातारा जिल्ह्यात खाजगी बसेससह, टेम्पो ट्रॅव्हलर आणि सुमारे दीड हजार काळ्या पिवळ्या जीप कार्यरत आहेत. चालक घरीच बसून राहिल्यामुळे त्याला व त्याच्या कुटुंबीयांना फार मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विमा कंपन्या इन्शुरन्स भरण्यासाठी मागे लागल्या आहेत. त्यामुळे एक वर्षासाठी शासनाने टॅक्स माफ करावा अशी आमची मागणी आहे. परराज्यातील कामगारांना त्यांच्या गावी पोहचवण्यासाठी खाजगी बस चालकांनी फार मोठे योगदान दिले आहे. मात्र त्यांच्यासाठी शासनाने कोणतेही संरक्षण दिले नाही. त्यांना संरक्षण द्यावे. वाहने खरेदी करण्यासाठी अनेकांनी कर्ज काढले असून आता बँका, फायनान्स कंपन्या हप्ते भरण्यासाठी तगादा लावत आहेत. कर्नाटक, गुजरात, ओरिसा आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी बस चालकांना फार मोठ्या प्रमाणावर सवलती दिल्या आहेत. मात्र महाराष्ट्रात अशाप्रकारच्या कोणत्याच सवलती मिळाल्या नाहीत. त्या देण्यात याव्यात. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशाराही प्रकाश गवळी यांनी यावेळी दिला.