स्थैर्य, कराड, दि.१३: कराड शहर परिसरात व पाटण शहर परिसरात चैन स्नॅचिंग व चोर्या करणार्या दोघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलला सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अक्षय शिवाजी पाटील (वय 22, रा. मंद्रुळकोळे, ता. पाटण), बंटी उर्फ विजय अधिक माने (रा. शितपवाडी, ता. पाटण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गेल्या काही महिन्यापूर्वी कराड शहर परिसरात व पाटण शहर परिसरात चैन स्नॅचिंग व चोरीच्या घटना घडल्या होत्या. चोरीच्या शोध अनुषंगाने गुन्हे उघड करण्याकरीता गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून विशेष पथक तयार करण्यात आलेले होते. पोलीस चोरीचा शोध घेत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक फौजदार राजेंद्र पुजारी, पोलीस नाईक सचिन साळुंखे, आनंदा जाधव यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की ढेबेवाडी परिसरातील दोघांनी कराड शहर परिसर व पाटण शहर परिसरात चैन स्नॅचिंग केल्या आहेत. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ढेबेवाडी येथून अक्षय पाटील व बंटी उर्फ विजय माने या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी कराड परिसर, पाटण परिसरात चैन स्नॅचिंग व काही ठिकाणी चोर्या अशा सहा गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, सहाय्यक फौजदार राजेंद्र पुजारी, पोलीस हवालदार सतीश जाधव, नितीन येळवे, जयसिंग राजगे, पोलीस नाईक संजय जाधव, सचिन साळुंखे, मारूती लाटणे, विनोद माने, प्रफुल्ल गाडे, तानाजी शिंदे, आनंदा जाधव यांनी केली.