
पाटण तालुक्यातील शिंगणवाडी (चाफळ) येथील महिलेची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने तब्बल ४१ वर्षांनंतर जटांच्या ओझ्यातून मुक्तता करण्यात आली.
स्थैर्य, पाटण, दि. ३० मार्च : पाटण तालुक्यातील शिंगणवाडी-चाफळ येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पुढाकाराने एका महिलेची जटांच्या जोखडातून मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर डोक्यावरील जटांचे ओझे हलके झाल्याने या महिलेने आणि तिच्या कुटुंबीयांनी समितीचे आभार मानले आहेत. शिंगणवाडी गावात अंनिसने राबवलेला हा दुसरा यशस्वी उपक्रम आहे.
समुपदेशनातून केले शंकानिरसन
शिंगणवाडी येथील इंदूबाई विलासराव यादव या गेल्या ४१ वर्षांपासून जटांचे ओझे वाहत होत्या. वाढत्या वयोमानानुसार त्यांना जटांमुळे मानेवर आणि मणक्यावर ताण पडून शारीरिक त्रास जाणवू लागला होता. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल घाडगे हे शिंगणवाडीत गेल्यानंतर त्यांनी इंदूबाईंचा मुलगा हणमंत यादव यांच्याशी जटा निर्मूलनाबाबत प्राथमिक चर्चा केली.
अंनिसच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार
या चर्चेनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षा वंदना माने, शहराध्यक्ष डॉ. दीपक माने आणि डॉ. अनिल घाडगे यांनी यादव कुटुंबीयांशी थेट संपर्क साधला. त्यांनी जटांमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत सविस्तर माहिती देऊन कुटुंबीयांचे शंकानिरसन केले. हणमंत यादव यांनी कुटुंबीयांची मनधरणी केल्यानंतर इंदूबाईंनी अखेर जटा काढण्यास होकार दिला आणि त्यांची या जोखडातून मुक्तता करण्यात आली.
“एकाच गावात पुन्हा जट निर्मूलनासाठी यावे लागणे हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मोठे यश आहे. या कार्यातून लोकांचे कौतुक आणि आम्हाला आत्मिक समाधान मिळते,” अशी भावना अंनिसच्या जिल्हा कार्याध्यक्षा वंदना माने आणि शहराध्यक्ष डॉ. दीपक माने यांनी व्यक्त केली.
