बीसीए, बीबीए प्रवेशासाठी आता ‘सीईटी’ आवश्यक

‘मुधोजी’मध्ये मार्गदर्शन कक्षाची स्थापना


दैनिक स्थैर्य | दि. ७ एप्रिल २०२४ | फलटण |
नुकतेच ‘यूजीसी’ने दिलेल्या निर्देशानुसार नवीन शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून बीसीए, बीबीए व बीएमएस हे अभ्यासक्रम एआयसीटीच्या अखत्यारीत आलेले आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचा दर्जा प्राप्त झाला आहे. मात्र, या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांना राज्य शासनाची ‘सीईटी’ द्यावी लागणार आहे, अशी माहिती मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम सर यांनी दिली.

बारावीनंतर बीसीए व बीबीए या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना राज्य सामायिक प्रवेश कक्षामार्फत घेण्यात येणारी सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. सीईटी परीक्षेसाठी बारावीची परीक्षा दिलेल्या किंवा बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी व निश्चिती दिनांक ११ एप्रिल २०२४ पर्यंत करावी लागेल. खुल्या प्रवर्गासाठी एक हजार तर राखीव प्रवर्गासाठी आठशे रुपये ऑनलाईन पेमेंट, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरणा करता येईल. ही प्रवेश परीक्षा प्रथमच महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील परीक्षा केंद्रावर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरणे, सिल्याबस, प्रश्नपत्रिका याबाबतचे सर्व मार्गदर्शन करण्यासाठी मुधोजी महाविद्यालय फलटण कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट विभाग या ठिकाणी मोफत मार्गदर्शन कक्षाची स्थापना केलेली आहे.

विद्यार्थ्यांना यासंबंधी कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्यांनी मार्गदर्शन कक्षाशी संपर्क करावा, त्याचा संपर्क क्रमांक ९९२२०११००१, ९९६०३५५९४९ असा आहे, असे मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य कदम सर यांनी सांगितले आहे.


Back to top button
Don`t copy text!