
दैनिक स्थैर्य | दि. २८ डिसेंबर २०२३ | फलटण |
कृषी आयुक्तालयाच्या नवीन नियमावलीनुसार कृषी सेवा केंद्र, खत व कीटकनाशक विक्री, उत्पादन, साठवणूक वितरणासाठी परवाना आवश्यक आहे. या अनुषंगाने श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषि महाविद्यालय, फलटण येथे कृषी निविष्ठा विक्रेतांकरिता कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या (देसी) या एक वर्षीय डिप्लोमा २०२२-२३ तुकडीचे प्रमाणपत्र वितरण समारंभ दिनांक २७ डिसेंबर २०२३ बुधवार रोजी संपन्न झाला.
राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था (मॅनेज) हैद्राबाद, वनामती, नागपूर, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सातारा आणि श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकरिता कृषी पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र वितरण समारंभ या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री. आर. एस. पवार, माजी उपसंचालक (मार्केटिंग), राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर लि., मुंबई हे लाभले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शरदराव रणवरे, अध्यक्ष, महाविद्यालयीन समिती, श्री. रणजित निंबाळकर, अध्यक्ष, फलटण डीलर असोसिएशन, फलटण, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम सर उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी केले. तसेच त्यांनी कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी पीक नुसार खताची माहिती देणे, विक्रेत्यांचे सबलीकरण करणे, कायदे व नियमांबद्दल माहिती देणे तसेच कृषी निविष्ठा विक्रेत्यांना गावातील कृषी संलग्नित माहितीचा स्रोत बनविणे हे या अभ्यासक्रमाचे मुख्य उद्दिष्टे आहेत, असे सांगितले. सदरील बॅचमधील विद्यार्थी व कृषि निविष्ठा विक्रेते श्री. विकास साळुंखे यांनी देसी पदविका अभ्यासक्रम अध्यापन करताना आलेला अनुभव, अभ्यासक्रमाचे आकलन, प्राध्यापक व महाविद्यालयाचे सहकार्य व पदविकेचे महत्व याबद्दल मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. आर. एस. पवार यांनी पदविकेचा अभ्यासक्रम, मॅनेज हैद्राबाद या संस्थेद्वारे आरेखित करण्यात आलेला आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी या अभ्यासक्रमाद्वारे कृषी व संलग्नित महत्वाची पिके याबद्दल माहिती आकलन करून शेतकर्यांना योग्य निविष्ठा करावी, असे अपेक्षित आहे असे प्रतिपादन उपस्थित कृषि निविष्ठा विक्रेत्यांना केले.
सन २०२२-२३ मधील सातारा जिल्ह्यातील एकूण ४० कृषी निविष्ठा विक्रेत्यांची तुकडी (बॅच) उत्तीर्ण झाली. सदरील कार्यक्रमाला कृषि महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सौरभ निकम यांनी केले.